राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे तिकिट कापल्यामुळे नाराज समर्थकांनी उमेदवार पराग शहा यांची घाटकोपरमध्ये गाडी फोडली. बोरीवलीमधून उमेदवारी न दिल्यामुळे चिडलेल्या तावडे समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांचा पत्ता कट करून भाजपने त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली आहे. तावडे, खडसे आणि प्रकाश मेहता यांच्यासह भाजपाने तब्बल २० आमदारांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडाचे निशाल फडकले आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या ७ तारखेपर्यंत बंडोबांची नाराजी दूर करण्यास पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने चार याद्या घोषित करत १५० उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज आमदारांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. विनोद तावडे यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे.

प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा, एकनाथ खडसे यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे, तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय मेधा कुलकर्णी, सरदार तारासिंह यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उभं राहता यावं, यासाठी मेधा कुलकर्णींना बाजूला करण्यात आलं. संगिता ठोंबरे यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट मिळालं आहे. जळगावातील चाळीसगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना आपल्या पत्नीला तिकीट मिळावं, अशी आशा होती, मात्र ती मावळल्याने पाटीलही खट्टू आहेत.

भाजपच्या या आमदारांचा पत्ता कट
१)उदेसिंह पाडवी, शहादा
२)सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर
३)राजू तोडसाम, आर्णी
४)मेधा कुलकर्णी, कोथरूड
५)दिलीप कांबळे, पुणे कँटोन्मेंट
६)विजय काळे, शिवाजीनगर
७)आर.टी. देशमुख, माजलगाव
८)सरदार तारासिंग, मुलुंड
९)विष्णू सावरा, विक्रमगड
१०)संगीता ठोंबरे, केज
११)सुधाकर भालेराव, उद्गीर
१२)राजेंद्र नजरधने, उमरखेड
१३)बाळा काशीवार, साकोली
१४)एकनाथ खडसे, मुक्ताईनगर
१५)चंद्रशेखर बावनकुळे, कामठी
१६)चरण वाघमारे, तुमसर
१७)बाळासाहेब सानप, नाशिक पूर्व
१८)विनोद तावडे, बोरीवली
१९)राज पुरोहित, कुलाबा
२०) प्रभुदास भिलावेकर, मेळघाट