सध्या महाराष्ट्राला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. अन्यथा तुमचा आवाज कोण मांडणार. सगळेच सत्तेत जाऊन बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार. तुमचा आवाज उठवण्यासाठी मला विरोध पक्षाच्या भूमिकेतून जायचं आहे असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी असं आवाहन जनतेला केलं आहे. “सत्तेच्या गुळाला सगळे डोंगळे चिकटत आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. यवतमाळमधील वणीत राज ठाकरेंची प्रचारसभा पार पडली.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी ही आपली येणारी जागा आहे असा विश्वास व्यक्त केला. भाषणाच्या सुरुवातीलाच तुम्ही अनेक गोष्टी विसरुन जाता. त्याची आठवण करुन देण्यासाठी मी येथे आलो आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं. “गेली पाच वर्ष आणि त्याआधी सत्तेत येताना भाजपा-शिवसेना युती तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीच्या हातून महाराष्ट्र का गेला हे समजून घ्यायची गरज आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका करत भाजपा-शिवसेनेच्या यशाला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली. “काँग्रेसच्या चुकीच्या कारभारामुळे भाजपा सत्तेत आली,” असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारमुळे भाजपा-सेनेला मदत झाल्याचंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर टीका करत तो वाचूनही दाखवला. तसंच यवतमाळची सर्वाधिक आत्महत्या झालेला जिल्हा ही ओळख कशी काय होऊ शकते? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. पण आम्हाला त्याचं काही वाटत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,” असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“निवडणुकीकडे गंमत, खेळ मजा म्हणून पाहिलंत तर विषय कधीच संपणार नाही. निवडणुकीच्या वेळी पैसे फेकले तरी ही माणसं सगळं विसरुन जातात असं यांना वाटत,” असल्याची टीका त्यांनी शिवसेना-भाजपावर केली. राज ठाकरे यांनी यावेळी हे माझं सरकार टी-शर्ट घालून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा उल्लेख केला. आत्महत्या म्हणजे काय गंमत आहे का ? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.

“जगाला हेवा वाटावा असा महाऱाष्ट्र माझ्या हातून घडावा अशी इच्छा आहे. तितकी आपल्याकडे ताकद आहे, सक्षम तरुण-तरुणी आहेत. पण अशाच प्रकारची माणसं मिळणार असतील तर महाराष्ट्र कधीच उभा राहणार नाही,” असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयाचा उल्लेख करत यामुळे देशावर मंदीचं सावट असल्याचं म्हटलं. रवीशंकर प्रसाद यांच्या चित्रपटांनी कोटींचा धंदा केला आहे या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. “चित्रपट चालले म्हणजे मंदी नाही…देशातील अनेक उद्योग बंद होत आहेत त्याला मंदी नाही म्हणायचं का?,” असा सवाल त्यांनी विचारला.

महाराष्ट्राला सध्या एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे असं सांगताना विरोधी पक्ष कमकुवत असल्यानेच असे निर्णय घेतले जातात. बहुमत आल्यानतंर जे हवंय तेच केलं जातं असं सांगताना तरीही तीच माणसं पुन्हा सत्तेत येणार असतील तर वरवंटा तुमच्यावरही फिरणार आहे असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

“माझी माणसं आत पाठवलीत तर तुमचा आवाज आत जाईल. सध्या राज्यात आणि केंद्रात विरोध पक्षाची भूमिकाच महत्त्वाची आहे,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्यावरुनही त्यांनी टीका केली. “काँग्रेसचे विरोधी पक्षनेते उठले आणि भाजपात गेले…हे काही एका दिवसात झालेलं नसणार. याचा अर्थ त्यांनी गेले अनेक दिवस विरोधाची भूमिका मांडलीच नाही. आजही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते भाजपातून निवडणूक लढवत आहेत. हे त्यांना आलेले अच्छे दिन,” असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

मी जाहीरनामा काढलेला नाही पण आतमध्ये जाऊन त्यांचा जाहीरनामा काढणार असं राज ठाकरेंनी सांगितलं, आहे. भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन करताना राज ठाकरेंनी मी तुमचा राग व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मागतोय असं सांगितलं.