आमदार ज्योती कलानींनी पक्षाचे तिकीट नाकारले

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेत नेत्यांचे प्रवेश होत असतानाच उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्योती कलानी यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे तिकीट नाकारल्याने कलानी कुटुंबीयांपैकी कुणाला तरी भाजप उल्हासनगरातून उमेदवारी देईल या चर्चेला पुन्हा जोर आला आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपची लाट असतानाही उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे तत्कालीन आमदार कुमार आयलानी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी यांनी पराभूत केले होते. मात्र २०१७ मध्ये उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ज्योती कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याला जवळ करत पालिकेवर सत्ता स्थापन केली. तेव्हापासून कलानी कुटुंबाची भाजप नेत्यांशी जवळीक वाढली आहे. २०१८ मध्ये ज्योती कलानी यांच्या सून पंचम कलानी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालण्यात आली. शहराचे महापौर पद कलानी कुटुंबाकडे आल्याने भाजप विधानसभेसाठीही याच कुटुंबापैकी कुणाचा तरी विचार करतील हे पक्के मानले जात होते. तसेच विधानसभा निवडणुकीत ज्योती कलानी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती.

पक्षाचे माजी आमदार कुमार आयलानी यांच्या समर्थकांनी विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने येथील राजकारणाची रंगत वाढली आहे. असे असताना ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट नाकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वृत्ताला त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी दुजोरा दिला आहे. ओमी कलानी थेट भाजपच्या तिकिटावर लढतील अशी शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगण्यात उतरण्याची दाट शक्यता आहे.

Story img Loader