शिवसेनेशिवाय राज्यात भाजपाचं सरकार स्थापन होऊ शकत नाही. तसंच शिवसेनेशिवाय राज्यात सरकार स्थापन झालं तर ते टिकणार नाही, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. शिवसेना भाजपाच्या अंतर्गत चर्चा काय आहेत, याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही, असंही ते म्हणाले.

भाजपानं काही आमदारांना आमदारांना आमिषं दाखवण्यास सुरूवात केली आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला. तसंच कोणत्याही पक्षाचा आमदार जर फुटला तर त्याच्याविरोधात सर्व पक्ष एकत्र येतील आणि त्याचा पराभव करतील, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांना जायचं होतं ते यापूर्वी गेले आहेत. सध्या नव्यानं निवडून आलेले आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले चेहरे राष्ट्रवादीकडे आहेत. तसंच विरोधातच बसण्याची आमची मानसिकता आहे, पाटील यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेशी कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना भाजपानं काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, असं पाटील म्हणाले. राष्ट्रपती राजवटीकडे जाण्याचं प्रश्न सध्या उद्भवत नाही. भाजपाने एकंदरीत परिस्थिती पाहून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. शिवसेनेने समान वाटा मागितला आहे तो त्यांना दिला तर राष्ट्रपती राजवटीचा प्रश्नच येणार नाही. परंतु भाजपानं जे त्यांना देण्याचं मान्य केलं आहे, ते का दिलं जात नाही, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेनं पाठिंबा मागितला नाही
शिवसेनेने आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही. तसंच आम्ही त्यांना पाठिबा देण्याचा कधी विचारही केला नाही. दोन्ही पक्षात काय होतंय याचा प्रश्न आहे. जनतेनं कौल शिवसेना भाजपाला दिलेला आहे. त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं. त्या दोन्ही पक्षांनी जे ठरवलंय तसं झालं तर राज्यात राष्ट्रपती राजवटीचा प्रश्न येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. आम्ही जर तर वर कोणत्याही गोष्टी करत नाही. आम्हाला वास्तवाची जाण आहे. आमचे ५४ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आमची विरोधात बसण्याची भूमिका आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.