“प्रत्येक बाबतीत हे सरकार नापास झालं आहे. त्यामुळे हे सरकार खाली खेचा. विजयाचा गुलाल उधळून झाला की लगेच दिवाळीचा सण आहे. भाजपा-सेना सरकारचं दिवाळं निघाल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी साजरी होणार नाही”, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवताना, मध्यंतरी भाजपाचा अजगर झाला होता. ईडी, सीबीआय, असे फुत्कार टाकून राष्ट्रवादीची माणसे गिळणाऱ्या या अजगरावर ७९ वर्षाच्या शरद पवार नावाच्या तरुणाने वर्मी घाव घातला, अशी टीका केली. ते लोणावळ्यात (मंगळवारी) सुनील शेळके यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

“महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, तरुणांचा रोजगार, माता भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, या सगळ्या समस्यांबाबतीत भाजपा सरकार नापास झाले आहे. निवडणुकीसाठी भाजपा सरकारकडे आता कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. निवडणूक मावळची, मुद्दा काश्मीरचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा..ही अशी निवडणूक असते होय?”, असा सवाल अमोल कोल्हे यांनी लोणावळ्यात सत्ताधाऱ्यांना केला.

पुढे बोलताना, “मध्यंतरी भाजपाचा अजगर झाला होता. ईडी, सीबीआय, असे फुत्कार टाकून राष्ट्रवादीची माणसे गिळणाऱ्या या अजगरावर ७९ वर्षाच्या शरद पवार नावाच्या तरुणाने वर्मी घाव घातला”, असेही कोल्हे म्हणाले. सभास्थळी येण्यास उशीर झाल्याबद्दल कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त करत नंतर टीकाही केली. मावळच्या रस्त्यावर ४०० कोटी खर्च झाले असते तर मी अर्धा तास लवकर आलो असतो, असे ते म्हणाले. ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे. ज्यांना भिडण्यासाठी दोन-दोन मुख्यमंत्री येतात त्या सुनील शेळके यांच्याशिवाय पर्याय नसल्याचं म्हणत कोल्हे यांनी शेळकेंना निवडून देण्याचं आवाहन केलं.