शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. शिवसेना प्रवेशासाठी सुनील तटकरे अनेकदा मातोश्रीभोवती घिरट्या घालत होते, असा दावा गीते यांनी केला आहे. तसंच त्यापूर्वी त्यांनी भाजपा प्रवेशासाठी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. परंतु त्या ठिकाणी काही झालं नाही. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेकडे आपला मोर्चा वळवला असल्याचं त्यांनी सांगितलं.

सुनील तटकरे यांनी अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्याला पक्षात घेण्याची विनंती केली होती, असा गौप्यस्फोट गीते यांनी केला. मला पक्षात घेतलं नाही तरी चालेल. परंतु माझी कन्या अदिती हिला पक्षात प्रवेश देऊन तिला उमेदवारी द्या अशी विनंती तटकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, असं त्यांनी सांगितलं. गुहागरमध्ये आयोजित सभेदरम्यान त्यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु हे वृत्त फेटाळत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सांगत तटकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. “मी राष्ट्रवादी सोडणार नाही. यापुढेही मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे,” असं तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं. तटकरे यांचा रायगडमध्ये प्रभाव असून त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा शिवसेनेला अधिक फायदा होणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु तटकरे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं.