राज्यातील सत्तास्थापन करण्याबद्दल मुंबईत अनेक बैठका झाल्या असल्या तरी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज चार वाजता बैठक होणार आहे. त्याआधीच शरद पवार यांनी सत्तास्थापन करण्यावरून सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारी गुगली टाकली आहे. “सत्तास्थापनेबद्दल शिवसेना-भाजपानं बघावं,” असं पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सरकार स्थापन करण्याबद्दल चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षांचा समान कार्यक्रम ठरला असून, यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी (१८ नोव्हेंबर) चार वाजता भेट घेणार आहेत. त्यापूर्वी शरद पवार यांनी सकाळी आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली.

दिल्लीत दाखल झाल्यानंतर शरद पवार यांना माध्यमांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बोलताना पवार म्हणाले, “भाजपा-शिवसेनेने सोबत निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा. आम्ही आमचं राजकारण करू,” असं पवार म्हणाले. मात्र, पवार यांच्या विधानाने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सोनिया गांधी यांच्यासोबतच्या भेटीला पवार यांनी दुजोरा दिला. “आज सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी भेटीची निश्चित वेळ सांगितली नाही. या चर्चेतून मार्ग निघण्याआधीच पवारांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी गुगली टाकली आहे.