सत्य नाकारुन भाजपाने डेड लॉक निर्माण केला आहे. शिवसेनेने हा डेडलॉक निर्माण केलेला नाही. शिवसेनेकडून कोणताही डेडलॉक नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. त्यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा नारा पत्रकार परिषदेत दिला. तसेच ज्यांच्याकडे १४५ चे बहुमत असेल त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं असा टोलाही भाजपाला लगावला.

२४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अब की बार २२० पार ही भाजपाची घोषणा हवेत विरली. महायुतीला जनादेश मिळाला मात्र शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपा सरकार स्थापन करु शकणार नाही ही परिस्थिती पाहताच शिवसेनेने आधी ठरल्याप्रमाणे सत्तेत अर्धा वाटा आणि मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगितला. दिवाळीच्या दिवशी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे असं काही ठरलंच नव्हतं असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे दोन्हीकडून चर्चा थांबली. सरकार स्थापनेचा पेच राज्यात निर्माण झाला जो गेल्या दिवसांपासून महाराष्ट्र पाहतोच आहे.

अशा सगळ्या परिस्थितीत संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. भाजपा नेत्यांनी सांगितल्यानुसार चर्चेसाठी शिवसेना तयार नाही त्यांनी डेडलॉक निर्माण केला आहे असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर  संजय राऊत यांनी उत्तर दिलं असून शिवसेनेकडून कोणताही डेडलॉक नाही असं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर सत्य नाकारल्याने भाजपाकडून डेडलॉक निर्माण झाला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.