शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत नेते आयात करण्याची गरज नव्हती असं म्हणत गोरेगावच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. जे काही पक्षांतरं सुरु आहेत त्यावरुन समजतच नव्हतं कोण कोणत्या पक्षात चाललं आहे? भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजपात गेले. घोटाळ्याचे आरोप असलेले शिवसेनेत गेले. बाळासाहेब ठाकरे असताना कुणालाही आयात करण्याची गरज भासली नाही असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना भाजपावर निशाणा साधला.

सध्या महाराष्ट्राला कुणाही समोर घरंगळत न जाणारा सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्राला हवा आहे. विरोध करणारं कुणी नसेल तर जे सरकार येईल ते तुमच्यावर वरवंटाच फिरवेल. अशा सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष ही काळाची गरज आहे. मात्र माझ्या आवाक्यात जे दिसतं आहे तेच तुम्हाला सांगतो आहे. असं म्हणत विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

आणखी वाचा- शिवसेना युतीत सडली आणि १२४ वर अडली : राज ठाकरे

ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी, आम्हाला निवडून यायचं आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल असाही आरोप राज यांनी केला.