पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

वाई : राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लोकभावना समजत नाही. जनतेने त्याबद्दल त्यांना लोकसभा निवडणुकीत शिक्षा दिली आहे. या निवडणुकीतही जनता विरोधकांना कडक शिक्षा देईल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि आठ विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातारा येथे गुरुवारी सभा झाली. सभेला शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, अतुल भोसले, महेश शिंदे, मदन भोसले, धैर्यशील कदम, पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते. सभेला मोदींसोबत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, जिल्हाध्यक्ष विR म पावसकर, उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व्यासपीठावर आले. तर सभा सुरू झाल्यावर संभाजी भिडे यांचे सभामंडपात आगमन झाले.

मोदी म्हणाले की, उदयनराजे यांच्या आणि भाजप-शिवसेनेच्या कामांची विरोधकांनी एवढी धास्ती घेतली आहे, की सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक लढवण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या दिग्गज नेत्यांनीही, माफ करा पण मला या निवडणुकीत ढकलू नका, असे सांगितले. शरद पवार हे हवेची दिशा नेहमीच ओळखतात असे सांगत मोदी म्हणाले की, यामुळेच ते या लढाईसाठी काँग्रेसला पुढे ढकलू पाहात होते. मुळात काँग्रेस-राष्ट्रवादीची युती ही अंतर्गत विरोधाने भरलेली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास उरलेला नाही. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि एकमेकांना शह देण्यासाठी हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते पाडापाडीचे राजकारण करीत आले आहेत, अशी टीका मोदी यांनी केली.

केंद्र आणि राज्यात शिवाजी महाराजांच्या विचारांनीच आम्ही काम करत असल्याचा दावा करून मोदी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत आम्ही देशाचे संरक्षण सामर्थ्य वाढवले. देशाची सुरक्षा, राष्ट्रवाद जपण्याला प्राधान्य दिले. देशाकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकविला. सशस्त्र नौसेना उभी केली. लष्कराला जागतिक पातळीवर आणून ठेवले आहे.

उसाच्या किमतीच्या तिप्पट उत्पन्न शेतकऱ्याला मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आता उसापासून साखरेबरोबरच इथेनॉलच्या कंपन्या आम्ही उभारणार आहोत. पेट्रोल-डिझेलमध्ये दहा टक्के इथेनॉलचा वापर करण्यावर आम्ही ठाम आहोत. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु शेतकऱ्यांनी उसाबरोबर अन्य पिकांकडेही वळायला हवे, असेही मोदी म्हणाले.

छत्रपतींचा संस्कार, परिवार आमच्यासोबत : तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना साष्टांग दंडवत करून मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सातारा आणि माझा पूर्वीपासून संबंध राहिला आहे. सातारा ही छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, रामशास्त्री प्रभुणे, शाहू महाराज आणि माझे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांची जन्मभूमी आहे. साताऱ्याला येणे म्हणजे तीर्थयात्रेला येण्याचे समाधान मला आहे. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाकडे शिवाजी महाराजांचे संस्कार होते, परंतु आता महाराजांचा पूर्ण परिवार आमच्याबरोबर आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ निर्माण करण्याची ताकद यातून आम्हाला मिळते, असा परिवार आमच्यासोबत आहे.

Story img Loader