साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची शैली चर्चत आहे. त्यांच्या शैलीवरून विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे. “लोकांना काय आवडतं याकडे लक्ष देऊ नये. छत्रपतींनी छत्रपतींसारखं वागावं,” असे रामराजे यांनी म्हटलं आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा फलटणसह सातारा जिल्ह्यात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसपासून स्वतःला दूर ठेवून आहेत. मात्र, ते भाजपात जाणार की, शिवसेनेत याविषयी संभ्रम आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी भाजपात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, “उदयनराजे भोसले यांनी माझा भाजपा प्रवेश थांबवला. मी त्यांच्या पक्षप्रवेशाविषयीही काही बोलू शकत नाही. त्यांनी माझा प्रवेश थांबवायला भारतीय जनता पार्टी कोणाच्या सांगण्यावरून कोणाचा प्रवेश थांबवेल, असं मला वाटत नाही,” असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.

यावेळी उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्यावरून मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,”सातार जिल्ह्याला राजकीय संस्कृती आहे. उदयनराजेंविषयी मी काहीही बोलणार नाही. छत्रपतींनी छत्रपतींसारखं वागायला हवं. लोकांना काय आवडतं, याकडे त्यांनी लक्ष द्यायला नको,” असा टोला त्यांनी लगावला.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यातही रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली होती. “सध्याच्या घडीला रडीचे राजकारण सुरू आहे व विकासाचे राजकारण मागे पडत आहे. कंपनी ही नोकरीसाठी आणायची असते. मागील पाच वर्षे ज्यांनी टीका केली ते भाजपात गेलेत. त्यांनी ८० कोटी रुपयांची कर्ज कार्यकर्त्यांच्या नावावर घेतली आहेत. सभापती पद हे कंपाऊंडच्या आत आहे. मला पद मिळण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही. मात्र चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपणास जिंकायची आहे,” अशी इच्छा त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली होती.