राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या आघाडीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग धरला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. तसंच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यातील जनतेची इच्छा असल्याचंही ते म्हणाले होते. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं असतं हे यापूर्वीच माहित असतं तर भाजपानं त्यांना पाठिंबा दिला असता, असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे.

“सत्तास्थापनेदरम्यान शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. परंतु भाजपानं त्यांचं ऐकलं नाही हे पाहून शिवसेनेनं त्यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी मी प्रयत्न केले. परंतु उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे आधी समोर आलं असतं तर भाजपानं त्यांना पाठिंबा दिला असता,” असं आठवले म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. “शिवसेनेनं केलेली आघाडी ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वांविरोधातील आहे. ही अनैसर्गिक आघाडी असून ती किती दिवस टिकेल याची कल्पना नाही,” असंही ते म्हणाले.

“बाळासाहेबांचं शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न केव्हाच पूर्ण झालं आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली शिवसेना राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेसकडून शिवसेनेच्या पाठिंब्याची अपेक्षा नव्हती. परंतु तो मिळाला आहे. आघाडीत मंत्रिपदावरून वाद होतील. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी जनतेची कामं करावी,” असंही आठवले यावेळी म्हणाले. “ही आघाडी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे टिकेल. परंतु मी भाजपासोबतच राहणार असून अन्य मित्रपक्षांबाबत कल्पना नाही,” असं त्यांनी सांगितलं.