मोठ्या शत्रूला दूर ठेवण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केलं आहे असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलं आहे. महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी करायची असेल तर शिवसेनेसोबत सरकार स्थापन कऱणं गरजेचं आहे असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडीच मुस्लिमांना आरक्षण देऊ शकतं असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

“महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी करायची असेल तर शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलंच पाहिजे. जर आम्ही सरकार स्थापन केलं नाही केलं तर भाजपा संधी साधून सरकार स्थापन करेल,” असं अबू आझमी यांनी सांगितलं आहे. तसंच भिवंडीत शिवसेना काँग्रेससोबत काम करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. काही गोष्टींसाठी शिवेसनेचं मन वळवावं लागणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने अखेर मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या बैठकीत सांगण्यात आले.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्यावर आघाडीमध्ये सहमती झाली असली तरी सत्तावाटपाचे घोडे अडलेलेच आहे. तिन्ही पक्षांना समान १४ मंत्रिपदे आणि महत्त्वाची खाती वाटून घ्यावीत, असा आग्रह काँग्रेसने धरला तर राष्ट्रवादीने अद्याप पत्ते खुले केलेले नसले तरी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. सत्तावाटपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुंबईत शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेशी सहमती झाल्यावरच सरकार स्थापण्याचा दावा करण्यात येणार आहे.

गृह राष्ट्रवादीला, महसूल काँग्रेसकडे?
खात्यांचे वाटप करताना गृह, महसूल, नगरविकास अशी पहिल्या टप्प्यात विभागणी करण्यात आली. यापैकी गृह राष्ट्रवादीला, नगरविकास शिवसेना तर महसूल काँग्रेसला मिळावे, असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसने तयार केला. याच पद्धतीने सर्व खात्यांचे वाटप व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. दोन्ही काँग्रेसने निश्चित केलेले सूत्र शिवसेनेला सादर केले जाईल. मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर अद्यापही सहमती झालेली नसली तरी काँग्रेसमधील इच्छुकांनी लगेच दिल्लीत लॉबिंग सुरू केले. आपली वर्णी लागली पाहिजे, अशी जुन्यांबरोबरच यापूर्वी संधी न मिळालेल्यांची मागणी आहे. अनेकांनी खरगे आणि वेणुगोपाल यांची भेट घेतली.