महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर गुरूवारी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आपल्या नव्या कारकिर्दीला सुरूवात केली. दरम्यान, यापूर्वी शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. परंतु काही कारणास्तव ही युती तुटली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यानं महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करत शिवसेनेनचा मुख्यमंत्री विराजमान झाला. दरम्यान, सध्या राज्यासमोर अनेक मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशातच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून राज्यातील लहान भावाला म्हणजेच मुख्यमंत्र्यांना साथ द्यावी, असं आवाहन शिवसेनेनं केलं आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोट्यांवर उतरून स्थिरस्थावर होईल. पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं आपल्या सामनाच्या संपादकीयमधून आपलं मत व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी केंद्राची भूमिका सहकार्याची हवी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल, असही शिवसेनेनं नमूद केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे, पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदी यांची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात हे सूत्र ठेवले तर जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग-लोभ का ठेवायचा? महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मान दिल्लीने ठेवावा व सरकारच्या स्थैर्याला चूड लागेल असे काही घडू नये याची काळजी घ्यावी, अशी मागणीही याद्वारे करण्यात आली आहे.