राज्यातील सत्तास्थापनेवरुन झालेल्या संघर्षानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध ताणले गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात दर दिवशी नाट्यमय घडामोडी घडत असून याचा परिणाम दिल्लीतही जाणवत आहे. एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेने संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वात काही विरोधी पक्षदेखील संविधान दिनानिमित्त आयोजित संसदेतील संयुक्त बैठकीवर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे सोमवारी रात्री शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते पहिल्यांदाच सोनिया गांधींना भेटले होते. यावेळी काँग्रेसच्या विरोध प्रदर्शनास पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेच्या खासदारांनी सोनिया गांधी यांना सांगितले असल्याचे बोलले जात आहे.काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी ही भेट आयोजित केली असल्याची माहिती आहे

याशिवाय आज विरोधीपक्षांकडून महाराष्ट्रातील राजकीय घडमोडींविरोधात निदर्शनं देखील केली जाणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस, डावी आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, आरजेडी, टीडीपी आणि डीएमके या पक्षांकडून महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वातील सरकारविरोधात संसदेच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संयुक्तरित्या निदर्शने केली जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्व विरोधीपक्षांची सकाळी एक संयुक्त बैठक देखील पार पडू शकते, या बैठकीतच संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याबाबत निर्णय अंतिम होऊ शकतो. याद्वारे सरकारला विरोधकांच्या एकजुटीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न होणार आहे.

२६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून भारत सरकारकडून देशभर साजरा केला जातो. यानिमित्त संविधान गौरवाचे कार्यक्रम, संविधान गौरव सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा २६ नोव्हेंबर ते १४ एप्रिलपर्यंत भारत सरकारतर्फे संविधान गौरव अभियान साजरे केले जाणार आहे. संविधान दिनानिमित्त आज संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार आहेत.