शिवडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परेल, लालबाग, काळाचौकी, घोडपदेव आणि लोअर परेलचा काही भाग या मतदारसंघात येतो. २००९ चा अपवाद वगळता ८० च्या दशकापासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेने शिवडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस उमदेवाराच्या तुलनेत अजय चौधरी यांनी या मतदारसंघात आघाडी घेतली आहे. परेल-लालबागच्या जनतेने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. पूर्वी या भागात गिरण्या मोठया प्रमाणात असल्याने हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जायचा. पण आता इथे अनेक बहुमजली टॉवर झाले आहेत, तरीही या भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे.

मनेसच्या बाळा नांदगावकरांनी २००९ साली शिवडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण त्यांना मनसेसाठी मतदारसंघाची बांधणी करता आली नाही. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांना मनसेचा एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. अखेर २०१४ विधानसभा निवडणुकीत अजय चौधरी यांनी त्यांचा पराभव केला. बाळा नांदगावकरांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजय चौधरी यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडे तुल्यबळ उमदेवार नाही.

मनसेने चौधरी यांच्याविरोधात संतोष नलावडे यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसकडून उदय फणसेकर रिंगणात आहेत. पण चौधरी यांच्या तुलनेत दोन्ही उमेदवारांचा तितका दांडगा जनसंपर्क नाही. मतदारांना दोघांबद्दल फारशी माहिती नाही. मराठी भाषिक मतदारांबरोबर अन्य मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. पण अजूनही मराठी मतांवरच प्रामुख्याने मदार आहे. मुंबईतील अन्य भागांप्रमाणे शिवडीतही जुन्या चाळी, पार्किंग, वाहतूक कोंडी आणि पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहेत. शिवडीमध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक शिवसेनेचे आहेत. शाखाप्रमुखापासून ते गटप्रमुखापर्यंत शिवसेनेचे नेटवर्क भक्कम आहे. त्यामुळे शिवडीमध्ये पुन्हा भगवाच फडकेल असे चित्र आहे.