मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही, कारण पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. महाराष्ट्रासोबत असलेलं आपलं नातं तात्पुरतं नसून आम्ही राज्यातच राहणार. येत-जात नाही राहणार असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांचा आज वाढदिवस असून त्यांना पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपावर हल्ला चढवला.

संजय राऊत यांना यावेळी शिवसेना राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेणार का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “फक्त पाच नाही तर पुढील २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल”. “महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावं लागणार आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

“आम्हाला ओला दुष्काळ, पायाभूत सुविधा अशा बाबींवर अजून काम करावं लागणार आहे. आमच्यासोबत जे जोडले गेले आहेत ते अनेक वर्ष सत्तेत होते. त्यांना राज्य चालवण्याचा मोठा अनुभव आहे. राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पुढील सरकार हे शिवसेनेच्या नेतृत्वातच येणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते बदलता येणार नाही,” असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

महाराष्ट्र काही केक नाही
“महाराष्ट्र काही केक नाही. या राज्याच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान राहिले आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे राज्याच्या कामगिरीमध्ये सुरुवातीपासूनच योगदान आहे. महाराष्ट्रातील काही काँग्रेसचे नेते हे भारताच्या स्वातंत्रसंग्रामामधील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चवळवळीतील मोठे नेते आहेत हे मी आज नाही अनेकदा बोललो आहे. वसंतदादा पाटील असो किंवा किसनवीर असो काँग्रेसचे अनेक नेत्यांचे कार्य मोठे होते. त्यामुळे हे केक कापण्याचं राहून द्या. महाष्ट्राच्या निर्मितीमध्ये आणि प्रगतीपथावर पुढे घेऊन जाण्यामध्ये ज्या नेत्यांचा वाट आहे ते सर्व सत्ताधारी सर्वच पक्षांचे नेते आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकसूत्री कार्यक्रम ठरवला आहे. सत्तेचा फॉर्म्युला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच ठरवतील,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. “यापूर्वी भिन्न विचारधारांचे नेत्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतरही राज्याचा कारभार सुरळीत सुरू होता. गेले अनेक वर्ष उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत. काही पक्ष एकत्र येऊन जर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतील तर त्यात त्यांचंच भलं आहे,” असंही ते म्हणाले.