महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये कोण सत्तास्थापनेवरुन युतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना भाजपामध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्याच आता शिवसेनेबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊतांनी शाब्दिक चपकार लगावली आहे. “शिवसेनेविषयी बोलणाऱ्या मुनगंटीवार यांनी स्वत:ला मंत्रीपद मिळणार का हे आधी पहावे,” असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेत पन्नास टक्के वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरही दावा केला आहे. तसंच लोकसभेपूर्वी पन्नास पन्नास टक्के फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान आपण असं कोणतंही आश्वासन शिवसेनेला दिलं नसून पुढील पाच वर्ष आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहेत. त्यातच आता दोन्ही पक्षांमधील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.
राऊत यांनी शिवसेनेची सत्ता स्थापनेत पन्नास टक्के वाटा हवा या आपल्या भूमिकेशी ठाम असल्याचे सांगण्यासाठी मुंबईमध्ये गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मुनगंटीवार यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मुनगंटीवार हे भाजपाची भूमिका मांडणारे कोण आहेत अशा आशयाचा प्रश्न उपस्थित केला. “भाजपाचे अनेक बडे नेते निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत किंवा त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा डाव असल्यासारखे वाटत आहे. त्यामुळेच शिवसेनेविषयी बोलण्याआधी मुनगंटीवार यांनी स्वत:ला मंत्रीपद मिळणार का हे तपासून पहावे” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते मुनगंटीवार
शिवसेनेने आपल्या समोर पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुनगंटीवार यांनी सेनेवर टीका केली होती. “शिवसेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. शिवसेनेला ज्याप्रकारे पर्याय खुले आहेत त्याचप्रकारे भाजपालादेखील पर्याय खुले आहेत. ‘रघुकुलरीत सदा चली आई’ या म्हणीनुसार जर आपण महायुती केली आहे. त्यामुळे आपण महायुतीतच राहणं आवश्यक आहे. शिवसेनेच्या मदतीसाठी ज्याप्रमाणे हात पुढे येत आहेत. त्याप्रमाणे भाजपाच्या मदतीसाठीही अनेक हात पुढे आले आहेत. मतदारांनी महायुतीला मतरूपी आशीर्वाद दिला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पर्याय खुले आहेत हे म्हणणं म्हणजे राजकीय घोडचुक ठरेल,” असं मुनगंटीवार म्हणाले होते.