सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष थकलेले नाहीत, थकणारही नाहीत असं आता माजी उपमुख्यमंत्री ्अजित पवार यांनी म्हटलं आहे. सुशीलकुमार शिंदे हे स्वतः थकले आहेत त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस थकले असल्याचं म्हटलं पण काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय कधीही थकणार नाहीत असे पक्ष आहेत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा मेळावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार चेतन तुपे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील टिंगरे उपस्थित होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या नेत्याना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाताना, चांगल्या प्रकारे संवाद साधावा. तसेच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार , देखील तेवढ्याच निष्ठेने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

काय म्हणाले होते सुशीलकुमार शिंदे ?

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील”

सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनीही घेतला होता. ते म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आता थकल्याची जाणीव झाली आहे. चांगली गोष्ट आहे, मात्र आमच्या विजयाचे पेढे खाण्यापुरता उत्साह बाळगा. सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं विलीनीकरण होईल असे संकेत दिले होते. मात्र अजित पवार यांनी ही शक्यता खोडून काढली आहे. तसंच सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केलं कारण ते स्वतः थकले आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.