युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असतानाच आता त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेचे कारण म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकीय व्यासपिठांवर वाढलेला वावर. बुधवारी तेजस हे संगमनेरमधील शिवसेनेच्या सभेमध्ये व्यासपीठावर दिसून आले. यानंतर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात रंगत असलेल्या चर्चांनुसार युवासेना प्रमुख पदाची माळ तेजस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास ठाकरे कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील दुसरा शिलेदार राजकीय आखाड्यामध्ये दिसेल.

आदित्य ठाकरे यांनी ३ ऑक्टोबर रोजी वरळी मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्याबरोबर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि धाकटा भाऊ तेजसही उपस्थित होता. बुधवारी निवडणुकीच्या सभेसाठी संगमनेरमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरेही गेले होते. सत्काराच्या वेळी तेजस ठाकरेंना मंचावर आमंत्रित करण्यात आले. तेजस हे मंचावर येत असताना उपस्थित शिवसैनिकांनी ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणा देत तेजस यांचे मंचावर स्वागत केले. त्यामुळे तेजस खरोखरच सक्रिय राजकारणामध्ये येणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Pawan Khera targets Modi
पवन खेरा यांनी कर्नाटक लैंगिक शोषण प्रकरणावरून मोदींवर साधला निशाणा
vaishali darekar kalyan lok sabha marathi news
कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या प्रचार दौऱ्याकडे ज्येष्ठ शिवसैनिकांची पाठ
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना

जाणून घ्या >> ‘तेजस अगदी माझ्यासारखाच’; जाणून घ्या का म्हणाले होते बाळासाहेब असं

राजकीय वर्तुळातील चर्चांनुसार तेजस यांचे थोरले बंधू आदित्य ठाकरे हे वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवत असून त्यांचा विजय जवळजवळ पक्का समजला जात आहे. त्यामुळेच आदित्य आमदार झाल्यानंतर युवासेना प्रमुखपदी २४ वर्षीय तेजस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून तेजस यांचा राजकीय मंचावरील वावर वाढल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाची ही पूर्वतयारी असल्याची चर्चा आहे. मागील वर्षी आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर सामानमध्ये छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तेजस ठाकरेंचा फोटो छापण्यात आल्यानंतर पहिल्यांदा तेजस यांच्या राजकरणातील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.

नक्की वाचा >> करोडपती आदित्य… प्रथमच समोर आली ठाकरे कुटुंबातील व्यक्तीची संपत्ती

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसंदर्भात झालेला गोंधळ टाळण्यासाठी आदित्य यांना आमदारकी मिळाल्यानंतर लगेचच तेजस यांच्या खांद्यावर युवासेनेची जबाबदारी दिली जाईल. शिवसेनेचा इतिहास पाहिल्यास राज ठाकरे हे युवासेनेत सक्रीय होते. उद्धव यांनी राज यांच्यानंतर सक्रीय राजकारणात सहभाग घेतला. शिवसेना पक्ष प्रमुखपदी उद्धव यांची निवड झाल्यानंतर दुखावलेल्या राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा आपला नवा पक्ष स्थापन केला. हा इतिहास पाहता शिवसेनेकडून काळजीपूर्वक निर्णय घेतले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.