विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यात सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एकीकडे राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तयारी असताना पिंपरी-चिंचवड शहरात तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जनहित लोकशाही या पक्षाकडून नताशा लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून पत्रकार परिषदेत हे जाहीर करण्यात आलं. नताशा लोखंडे चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. नताशा लोखंडे यांच्यासह चार उमेदवारही निवडणूक लढवणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये जनहित लोकशाही पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मावळ विधानसभेतून संतोष चौधरी, भोसरी विधानसभेतून विश्वास गजमल, चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी नताशा लोखंडे आणि पिंपरी विधानसभेतून अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
यासंबंधी बोलताना नताशा लोखंडे यांनी सांगितलं की, “माझा लढा हा सरकारविरोधी आहे. तृतीयपंथीयांचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे मला ही निवडणूक लढवायची आहे”.. दरम्यान, नताशा यांना चिंचवड मतदारसंघातील प्रश्नांची जाण नसल्याचे यावेळी दिसून आले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना चांगलाच घाम फुटला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माघार घेणार नसल्याचे सांगत मीच जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.