विधानसभा निवडणूक लढवण्यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी राजकीय सल्ला देत टीका केली आहे. “लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” असा सल्ला देत “राज्यातील कुठल्याही मतदारसंघात चव्हाण उभे राहिले तरी हरतील, अशी टीका तावडे यांनी केली.

नांदेड विभागातील भाजपच्या मीडिया वॉर रुमचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांचा समाचार घेतला. “माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव  झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच जिल्ह्यात वाताहत झाली आहे. आता त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये आणि आपली उरलीसुरली पत घालवू नये, असा सल्ला आपण देत आहोत,” असेही तावडे म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राज्यातल्या २८८ विधानसभा मतदारसंघापैकी कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी पराभूतच होतील,” असा दावा तावडे यांनी केला.

राज्यात शिवसेना-भाजपा युती होणारच असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. “जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सुटेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती लोकसभेप्रमाणेच यावेळीही मिळणार आहे. त्यामुळे मागील विधानसभेपेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील. काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था दयनीय झाली असून, वंचित बहुजन आघाडी हा आगामी विरोधी पक्ष असेल,” असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. “वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनी अनेकांनी हडप केल्याची माहिती पुढे येत असून, याचा आपण सखोल अभ्यास करत आहोत. सबळ पुरावे आणि माहिती समोर आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करु,” अशी माहिती तावडे यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.