सत्तास्थापनेसाठी वारंवार चर्चा होऊनही शिवसेनेसोबत काही जमत नसल्याचा संदेश आमच्यापर्यंत आल्याने आम्ही अजित पवारांसोबत गेलो होतो, असे स्पष्टीकरण आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांनी दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. शपथविधीवेळी अजित पवारांसोबत गेलेले दौलत दरोडा, अनिल पाटील आणि नरहरी झिरवळ हे तिघेही आमदार पुन्हा परतले आहेत.

दरोडा म्हणाले, “आम्ही कुठेही बंडखोरी करुन गेलो नव्हतो. ही केवळ अफवा होती. या काळात सुप्रिया सुळे, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी संपर्कात होतो.” राज्यात एनसीपीचे सरकार बनणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हे तीनही आमदार परतल्याने आता अजित पवारांसोबत केवळ आमदार आण्णा बनसोडे असल्याचे कळते.

“शिवसेनेसोबत काही जमत नसल्याचा संदेश आम्हाला आला. त्यामुळे बाकीचे आमदार नंतर येतील. आपल्याला पुढे जायचं आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही अजित पवारांसोबत गेलो. राष्ट्रवादीचे आमदार पळून गेले असं काहीही नव्हतं. आम्ही शरद पवारांना फोन केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला शिवसेना, काँग्रेससोबतच जायचं आहे. आम्ही त्यांना आश्वस्त केलं की आम्ही परत येत आहोत,” असे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, “काही लोक आम्हाला विमानतळावर घेऊन गेले तिथून आम्ही दिल्लीतील एका हॉटेलकडे रवाना झालो. तिथून बाहेर पडण्यासाठी आम्हाला खूपच भीती वाटत होती. कारण, तिथे भाजपाचे शंभर ते दोनशे कार्यकर्ते आणि मोठा पोलीस फौजफाटा होता. मात्र, शरद पवारांनी त्यांच्या काही नेत्यांच्या माध्यमातून आम्हाला तिथून बाहेर काढलं.”

Story img Loader