राज्यसभेच्या अडीचशेवे सत्र सोमवारी सुरु झाले. या सत्राच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या भाषणात राष्ट्रवादीचे कौतुक केले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या दोन महत्वाच्या नेत्यांनी केलेली सुचक वक्तव्ये आणि त्यातच शिवसेनेची झालेली गोची यामुळेच आता राज्यामध्ये पुन्हा एकदा २०१४ प्रमाणे भाजपा बहुमत सिद्ध करण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. अशातच अनेकदा भाजपाच्या नेत्यांनी प्लॅन बी तयार असल्याचे संकेत अनेकदा दिले आहेत. ताज्या घडामोडी पाहता राज्यामध्ये भाजपा राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्ता स्थापन करु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपाचे १०५ आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. त्यामुळेच भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास १५९ आमदार संख्येच्या मदतीने राज्यामध्ये सहज बहुमत सिद्ध करता येईल. याशिवाय भजापाला १४ लहान मोठ्या पक्षांच्या आमदारांने पाठिंबा दर्शवला असल्याने एकूण संख्याबळ १७३ पर्यंत जाईल. राष्ट्रवादीने अगदी थेट सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला तरी भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत सिद्ध करता येईल. विश्वासदर्शक ठराव जेव्हा विधीमंडळाच्या पटलावर येईल तेव्हा राष्ट्रवादीचे सर्व आमदार अनुपस्थित राहिल्यास भाजपाचा मार्ग सुखकर होईल. राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व ५४ आमदार गैरहजर राहिल्यास एकूण संख्या २३४ होईल. असं झाल्यास बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला १४४ नाही तर ११७ जागांची गरज असेल. सध्या भाजपाचे १०५ आणि १४ अपक्ष आमदार अशी एकूण संख्या ११९ आहे. त्यामुळे भाजपाला सहज बहुमत सिद्ध करता येईल. २०१४ साली अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे आमदार विश्वासदर्शक ठरवाच्या वेळी सभागृहाबाहेर निघून गेल्याने आवाजी मतदानाने भाजपाने बहुमत सिद्ध करुन सरकार स्थापन केले होते. नंतर शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाली होती.

राष्ट्रवादी थेट किंवा बाहेरुन राज्यात भाजपाला सत्तेस्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकते. राष्ट्रवादीने थेट सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास ते उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाच्या मंत्रीपदांवर दावा सांगू शकतात. तसेच केंद्रामध्येही ते सत्तेत वाटा मागू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असं असलं तरी शरद पवार यांनी आधीच दोन्ही काँग्रेस एकत्र मिळून काय तो निर्णय घेतील असं याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी थेट सत्तेमध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी असली तरी भाजपा पुन्हा एकदा २०१४ चा पॅटर्न राबवून सत्ता स्थापन करु शकते.