भारतीय अर्थव्यवस्थेवर आर्थिक मंदीचे संकट ओढवले असून, मोठ्या प्रमाणात रोजगार कपात केली जात आहे. दुसरीकडे राज्यात रोजगार वाढला असल्याचा दावा राज्यातील भाजपा सरकारकडून केला जात आहे. याचा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो ट्विट करून वेगळ्या शैलीत समाचार घेतला आहे.

भारतीय अर्थव्यवस्था आणि वाढत असलेल्या बेरोजगारीवरून काँग्रेसकडून भाजपा लक्ष केल जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी आदी नेत्यांनी मोदी सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेवर संकट आले असून, बेरोजगारी वाढल्याचा आरोप केला आहे.

त्यात आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही उडी घेतली आहे. सत्यजित तांबे यांनी भाजपाच्या काळात राज्यात झालेल्या रोजगार निर्मितीवर व्यंगात्मक भाष्य केलं आहे. तांबे यांनी विराट कोहलीचा हस्तांदोलन करतानाचा फोटो ट्विट केला आहे. त्यावर “भाजपाच्या राज्यात महाराष्ट्रात रोजगार मिळालेल्या तरुणाशी हात मिळवतांना विराट,” अशी टीका केली आहे.

भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या पहिल्या तीन आठवडय़ांत ८.१ टक्के इतका नोंदला गेल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजे ‘सीएमआयई’ या संस्थेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हटले होते. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याच्या विरोधकांच्या आरोपांना त्यामुळे पाठबळ मिळाले होते. “एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात हा दर ७.९ टक्के, दुसऱ्या आठवडय़ात ८.१ टक्के, तिसऱ्या आठवडय़ात ८.४ टक्के असा चढाच राहिला आहे,” असे मतही सीएमआयईने नोंदवले होते.

Story img Loader