महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिलेले नाही. महाराष्ट्रात आज ज्या वेगाने राजकीय घडामोडी घडत होत्या. त्यामुळे शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा हमखास मिळेल असे चित्र निर्माण झाले होते. पण अजूनही तसे घडलेले नाही.
सोमवारी रात्री काँग्रेसची बैठक संपल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली आणि उद्या पुन्हा राष्ट्रवादी बरोबर चर्चा करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसकडून जे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे त्यामुळे शिवसेना मात्र तोंडघशी पडली आहे.
सरकार स्थापनेसाठी भाजपाने मातोश्रीवर अनेक फोन केले पण उद्धव ठाकरेंनी फोनला उत्तर दिले नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. सहाजिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाठबळ असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी इतकी ठाम भूमिका घेतली. पण प्रत्यक्षात पाठिंबा देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र हे दोन्ही पक्ष ठामपणे समोर आलेले नाहीत.
शिवसेनेचे नेते संजय राऊत सतत सिलवर ओकवर जाऊन शरद पवारांबरोबर चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत आहे मग अजूनही त्यांनी पाठिंब्याचे पत्र का दिलेले नाही? असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. काँग्रेसच्या राज्यातील आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा असला तरी दिल्लीतील नेतृत्व तयार नसल्याचे वृत्त आहे. कारण शिवसेना आणि काँग्रेस हे पूर्णपणे भिन्न विचारधारेचे पक्ष आहेत. तत्कालिन फायद्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला तरी भविष्यात अन्य राज्यांमध्ये काँग्रेसला अनेक प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. त्यामुळे काँग्रेसकडून निर्णयाला विलंब होत आहे.
दरम्यान राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. शिवसेनेचे विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी राज्यपालांची भेट घेतली. शिवसेनेने मुदत वाढवून देण्याची मागणी केली पण राज्यपालांनी त्यास नकार दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.