विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यामध्ये सुरु असतानाच कोल्हापूरमध्ये विधानसभेबरोबरच लोकसभेच्या जागेसाठीही मतदान होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. उदयनराजे यांची लढत माजी राज्यपाल आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याशी होणार आहे. उदयनराजेंनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. या महितीनुसार उदयनराजेंकडे १८५ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यात जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. उदयनराजेंनी त्यांच्या नावावर एकूण ४३४.३५ एकर जमीन आहे. या जमिनीची एकूण किंमत ११६ कोटी ३५ लाख ७३ हजार २२० रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंच्या नावावर असलेल्या या भूभागाचा एकूण आकार हा जगातील सर्वात छोटा देश असणाऱ्या व्हॅटिकन सिटीपेक्षा चौपटहून अधिक आहे. तर जगातील दुसरा सर्वात छोटा देश असणाऱ्या मोनॅकोचे एकूण श्रेत्रफळ हे उदयनराजेंकडे असणाऱ्या जमीनीपेक्षा केवळ ५९ एकरने अधिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदनयराजेंनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची अनेक ठिकाणी जमीन आहे. शुक्रवार पेठ (सातारा), कडोली (सातारा), सोनगाव तर्फे, पेट्रो (सातारा), नवीलोटीवाडी (सोलापूर) या ठिकाणी शेतजमीनी आहेत. तसेच गोडोली, कोडोली (सातारा) येथे बिगरशेती जमीनी आहेत. तसेच रविवार पेठेमध्ये गाळा असल्याचेही या शपथपत्रात म्हटले आहे.

या एकूण जमीनीचे आकारमान ४३४.३५ एकर इतके आहे. जगातील सर्वात छोटा देश असणारा व्हॅटीकन सिटी हा केवळ १०८ (अंदाजे) एकरात वसलेला आहे. तर दुसरा सर्वात लहान देश असणाऱ्या मोनॅकोचे एकूण श्रेत्रफळ ४९४ (अंदाजे) एकर इतके आहे. म्हणजेच उदयनराजेंच्या नावे असणारी जमीन एखाद्या देशाचे क्षेत्रफळ असते तर तो जगातील दुसरा सर्वात छोटा देश ठरला असता.


एकूण संपत्ती

लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांची जंगम मालमत्ता १३ कोटी ८१ लाखांची होती. तर आता ती १४ कोटी ४४ लाखाच्या पुढे गेली आहे. त्यांच्याकडे सोने-हिऱ्याचे दागिने, कंठहार, शिरटोप असे सुमारे ४० किलोचे दागदागिने आणि ऑडी, मर्सिडिज बेन्झ, इण्डेवर अशा गाडय़ा आहेत.

गुन्हे…

पुण्यामधील फर्गसन महाविद्यालयातून १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उदयनराजेंवर खंडणी, कट रचून खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे २३ गुन्हे दाखल आहेत. शरद लेवे खून प्रकरणातून सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली तरी या निर्णयास राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

विरोधकही श्रीमंत

उदयनराजेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले श्रीनिवास पाटील हेसुद्धा गर्भश्रीमंत आहेत. त्यांच्याकडे १० कोटींची जंगम तर ११ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या पाटील कुटुंबाने दागदागिने, बँकांमध्ये ठेवी, कंपनीत गुंतवणूक केली असून मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीस ६० लाखांचे कर्ज दिल्याची नोंद या प्रतिज्ञापत्रात आहे.

मराठीतील सर्व विधानसभा निवडणूक २०१९ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Total land own by udayanraje bhosale is bigger than area of smallest country in world scsg