लोकसत्ता वार्ताहर
कराड : कराड शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी संतोष यशवंत साठे (रा. म्हासोली) याला महिलेच्या फिर्यादीवरून अटक केली होती. दरम्यान, त्याला अस्वस्थ वाटून त्रास होवू लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी साठेने तेथून पलायन केल्याने पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मोठी यंत्रणा राबवत साठेला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याला ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष यशवंत साठे (रा. म्हासोली) याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला आरोग्याच्या दृष्टीने त्रास होवू लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्यानुसार पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना संबंधित संशयिताने बुधवारी सकाळी रुग्णालयातून पलायन केले.
काहीकाळ तो रुग्णालयात न दिसल्याने तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी तात्काळी त्याची माहिती वरिष्ठांना दिली. यावर सातारचे पोलीस अधिक्षक समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी संशयिताच्या शोधासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, श्रीमती शादिवान, फौजदार आंदेलवार, पोलीस कर्मचारी संदीप कुंभार, संग्राम पाटील, आनंदा जाधव, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, कुलदीप कोळी, सज्जन जगताप, संतोष पाडळे यांची तीन पथके मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणी पथके रवाना केली. संबंधितांच्या शोध पटकन व्हावा, यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी एक संदेश समाज माध्यमांवर पाठवला होता.
त्याची माहिती घेवून काहीजणांनी अशोक भापकर यांना साठे हा सातारा येथे आल्याचे सांगितले. त्यादरम्यान, संबंधित हा जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याची माहितीही काही जणांनी भापकर यांना दिली. त्यावरुन भापकर यांनी संबंधित संशयितास ताब्यात घेण्यासाठी सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा शहर पोलीस ठाण्याची स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेवुन संबंधित संशयितास ताब्यात घेतले. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला. संबंधित संशयिताला ताब्यात घेऊन पोलीस ससून रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.