लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या बदलीनंतर प्रभारी आयुक्त पदासाठी दीड दिवसाचा खेळखंडोबा निदर्शनास आला. गुप्ता यांच्या बदलीनंतर अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे गुरुवारी सायंकाळी सोपवण्यात आलेले प्रभारी आयुक्तपद २४ तास उलटण्यापूर्वीच काढून घेण्यात आले असून, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे प्रभारी आयुक्तपद नगरविकास विभागाने सोपवले.
महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या श्री. गुप्ता यांची दोन दिवसांपूर्वी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव म्हणून बदली झाली. यानंतर सांगलीचे आयुक्तपद रिक्त होते. या पदावर नगरविकास विभागाकडून गुरुवारी प्रभारी आयुक्तपदी नीलेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे कळविले. यानुसार त्यांनी तत्काळ प्रभारी आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यभारही स्वीकारला.
प्रभारी आयुक्त म्हणून देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेचे अंदाजपत्रकही सादर केले. मात्र अंदाजपत्रकाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली पत्रकार बैठक संपल्यानंतर दुपारी नगरविकास विभागाकडून प्रभारी आयुक्तपदी अडसूळ यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले. देशमुख यांना दीड दिवसाचे प्रभारी पद मिळाले.
याबाबत महापालिकेत उलटसुलट चर्चा सुरू असून प्रभारी आयुक्त पदासाठी मोठी चढाओढ अधिकाऱ्यांमध्ये असल्याचे सांगण्यात येते. देशमुखांपेक्षा अडसूळ ज्येष्ठ असल्याने त्यांना डावलून देशमुख यांच्याकडे प्रभारी पद कसे देण्यात आले, याचीच चर्चा सुरू आहे. नगरविकास विभागाने काढलेल्या पत्रात प्रभारी पद नियुक्तीमध्ये घाई झाल्याचे दिसून येते.
आयुक्त गुप्ता यांची बदली मुदतपूर्व झाल्याने त्यांची बदली राजकीय कारणातून झाल्याचे समजते. घरपट्टीवाढीच्या कारणावरून त्यांना सामान्याबरोबरच राजकीय नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याबाबत विधानसभेतही चर्चा उपस्थित झाल्यानंतर एक महिना वाढीव कर आकारणीस स्थगिती देण्यात आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगलीत सांगितले असता, विधिमंडळात मात्र दोन वर्षे घरपट्टी जुन्याच दराने आकारली जाईल, असे सांगितले. वाढीव घरपट्टीबाबत महापालिका प्रशासनाकडून पालकमंत्री पाटील यांना अपुरी माहिती दिली, यामुळेच गुप्ता यांची तातडीने बदली करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, प्रभारी आयुक्त नियुक्तीवरून महापालिका क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून, महापालिकेत गेल्या दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत असलेला संघर्ष सुप्तावस्थेत असल्याचे आज झालेल्या पत्रकार बैठकीतही दिसून आले. आज झालेल्या पत्रकार बैठकीत महापालिकेच्या शाळांबाबत माध्यम प्रतिनिधींनी काही शिक्षक अल्प मानधनावर पोट शिक्षक नियुक्त करत असल्याने शैक्षणिक दर्जाबाबत काय असा सवाल उपस्थित केला. या वेळी श्री. अडसूळ यांनी तशी तक्रार आली तर चौकशी केली जाईल असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी प्रभारी पद हाती असलेल्या देशमुख यांनी, आपणच चौकशी करायला हवी असे सांगत अडसूळ यांच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न केला. यावरून उभय अधिकाऱ्यांमध्ये बेबनाव असल्याचे प्रभारीपद नियुक्तीवरून स्पष्ट झाले.
प्रभारी आयुक्त पदावरून झालेल्या खेळखंडोबाचे पडसाद मावळते आयुक्त गुप्ता यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभावेळी दिसून आले. प्रशासनाच्यावतीने सकाळी अतिरिक्त आयुक्त असलेल्या अडसूळ यांच्या हस्ते दुपारी प्रभारी आयुक्त या नात्याने गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रभारी पदावरून दूर करण्यात आलेले अतिरिक्त आयुक्त देशमुख मात्र गैरहजर राहिले.