नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये एका इनोव्हा कारमधून पोलिसांनी १ कोटी ९८ लाख २३ हजार ३०० रूपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. मालेगाव नगरहून जाणाऱ्या मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मालेगाव शिर्डी महामार्गावर ही घटना घडली. रात्रीच्या वेळी ही रक्कम घेऊन जाणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची कसून चौकशीही सुरू आहे. महादेव मार्कंड आणि मोहन शेलार अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालेगाव चौफुलीवर पोलिस उपनिरीक्षक पी. टी. सकपाळे, उपनिरीक्षक ए. एच. शेख हे इतर कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. तिथे त्यांना  एम.एच.१२, डी.वाय ५७३६ या इनोव्हा गाडीबाबत संशय आला. त्यामुळे या गाडीची त्यांनी झडती घेतली तेव्हा ही रक्कम आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या नोटा ५०० आणि २००० रुपयांच्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी तातडीने आयकर आयुक्तानाही माहिती दिली आहे. त्यांच्या सूचनेनंतर पुढची कारवाई होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
महादेव मार्कंड आणि मोहन शेलार हे दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत. ते एवढी मोठी रक्कम घेऊन कुठे निघाले होते? हा प्रश्न पोलिसांनी त्यांना विचारला, तेव्हा एका प्रथितयश बांधकाम व्यावसायिकासोबत जमिनीचा व्यवहार होता, त्याला देण्यासाठी हे पैसे आणले होते असे उत्तर या दोघांनी दिले. मात्र हा व्यवहार झाला नाही असेही त्यांनी सांगितले आहे. आता या माहितीची सत्यता पोलिस पडताळून पाहात आहेत. तसेच या दोघांची कसून चौकशीही सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा