जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या वादळी वा-याने विद्युत वितरण कंपनीचे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान तासगाव, जत तालुक्यात झाले आहे. दुष्काळी पट्टय़ात झालेल्या वादळ-वा-यासह झालेल्या पावसाने ५३ रोहित्रे निकामी झाल्याची माहिती वितरण कंपनीकडून देण्यात आली. जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज कामगार रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत.
चालू वर्षी मार्चपासून जिल्ह्याच्या विविध भागात प्रामुख्याने तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, विटा तालुक्यातील दुष्काळी भागात वादळी वा-यासह गारपीट करीत उन्हाळी पावसाने झोडपून काढले. सरत्या रब्बी हंगामातील पिकांना गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. शेतीबरोबरच वीज वितरण कंपनीलाही वादळवा-याने जोरदार तडाखा दिला आहे.
वादळामुळे विजेचे ११०० खांब मोडून पडले. त्यापकी १७८ खांब उच्च दाब वाहिनीचे तर ९२२ खांब कमी दाब वाहिनीचे होते. यापकी ६३३ खांबांची पुनर्उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय ११७२ खांब वाकल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. यापकी ७५९ खांब आतापर्यंत सरळ करण्यात आले असून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वा-यामुळे उच्च दाब वाहिनीच्या २७.९ कि.मी. तर लघु दाब वाहिनीच्या ९८ कि.मी. तारांचे नुकसान झाले असून तारा बदलण्याचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ५३ विद्युत ट्रान्स्फॉर्मर म्हणजेच रोहित्र पूर्णपणे निकामी झाली. त्यापकी ३८ रोहित्रे बदलण्यात आली आहेत. वादळामुळे विद्युत वितरण कंपनीचे १ कोटीचे नुकसान झाल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

Story img Loader