लोकसत्ता वार्ताहर

कराड : महाराष्ट्रामध्ये एक लाख ३२ हजार लाभार्थ्यांना आम्ही उद्योजक घडवू शकलो. याहून अधिक लाभार्थ्यापर्यंत महामंडळाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून नव उद्योजकांमध्ये उत्साह आहे. भविष्यामध्ये या योजनेमधून अजून लाभार्थी व्हावेत असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

कराडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामंडळाचे जिल्हा समन्वयक गणेश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली माथाडी कामगार चळवळ, माथाडी कामगार संघटना व माथाडी कायदा १९६९ या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचीही माहिती यावेळी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

नरेंद्र पाटील म्हणाले, काही तांत्रिक गोष्टींमुळे व्याज परतावा वेळेवर जात नाही. तो लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल. महामंडळाच्या लाभार्थ्यांना १२ टक्के व्याज परतावा दिला जाईल. राज्यांमध्ये खास करून जिल्ह्यात जास्त प्रमाणामध्ये गरजू तरुणांना उद्योजक करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका हातभार लावतील.

ते म्हणाले, माथाडीचं विधेयक आणलं. त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की, चांगल्या पद्धतीने खरा कामगार कायदा अवलंबून आला जाईल. ज्याठिकाणी अधिकृत कामगार असतील, तिथं यानंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या माथाडी कामगारांना न्याय मिळेल, असा आम्हाला कामगार मंत्र्यांच्या माध्यमातून पूर्णपणे विश्वास आहे.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांमधून जी महामंडळाची खरी योजना राबवली पाहिजे, त्याच्यासाठी काही बँका टाळताळ करीत आहेत. त्यामागे संबंधित कर्जदाराचा सिव्हिल स्कोर कारणीभूत आहे. परंतु, आम्ही महामंडळाच्या माध्यमातून वारंवार तालुकास्तरावरच्या बैठकीमध्ये आमचे लाभार्थी व समन्वयक जात असतात आणि राष्ट्रीयकृत बँकांशी चर्चा करत असतात. पण असे एखादे प्रकरण तुमच्या कुणाचे लक्षात आल्यास नक्कीच तुम्ही आमच्या जिल्ह्याच्या समन्वयकांना किंवा मला प्रत्यक्षात सांगितलं, तरी आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना त्याबाबत विचारणा करू. त्यांची काय अडचण आहे, याची माहिती घेऊ, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

तसेच या महामंडळाच्या कर्ज प्रकरणांकडे राष्ट्रीयकृत बँकांनी जरी दुर्लक्ष केले असले, तरी खाजगी बँकांबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकांचे या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याची माहिती देत त्यांनी या बँकांच्या कामाचे कौतुक नरेंद्र पाटील यांनी यावेळी केले.

राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे माथाडीत गुंडगिरी पसरली

काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे माथाडीमध्ये गुंडगिरी पसरल्याचे मान्य करत नरेंद्र पाटील यांनी त्यांचाही बंदोबस्त केला जाईल, असे सांगितले. राज्याच्या मंत्र्यांच्या कानावर या गोष्टी घालून माथाडीमध्ये घुसलेल्या परप्रांतीय कामगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी आम्ही महामंडळाच्या वतीने करू. या अशा व विविध गोष्टी तसेच महामंडळ भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

माथाडी बोर्डात कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणली

गेल्या अडीच वर्षांत असलेल्या सरकारच्या कामगार मंत्र्यांनी आणि त्यांच्या हाताखालच्या काही कामगार नेत्यांनी माथाडी बोर्डाचा दुरुपयोग करून कॉन्ट्रॅक्ट पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये वाढवल्याने मूळ उद्देश बाजूला गेला. नव्याने झालेल्या सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आताचे नवीन कामगार मंत्री आकाश फुंडकर एक चांगला तरुण कार्यकर्ता आज मंत्री झाले आहेत. ते सध्या चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.