देशात सर्वाधिक अवैध वृक्षतोड महाराष्ट्रात
राज्यात गेल्या वर्षभरात अवैध वृक्षतोडीची १५ हजारांवर प्रकरणे निदर्शनास आली असून तब्बल १ लाखांवर वृक्ष राखीव जंगलांमधून नाहीसे झाले आहेत. एकीकडे, वृक्षलागवडीत कोटीची उड्डाणे घेतली जात असतानाच मोठय़ा संख्येने झाडांच्या कत्तलीही होत असल्याचे चित्र आहे. देशात सर्वाधिक वृक्षतोड महाराष्ट्रात झाली आहे. त्याखालोखाल आंध्रप्रदेश आणि तेलंगणाचा क्रमांक आहे.
वनखात्याच्या आकडेवारीनुसार राज्यात २०१५-१६ या वर्षांत अवैध वृक्षतोडीची १५ हजार ४५७ प्रकरणे निदर्शनास आली. यात १ लाख ३ हजार ४१४ झाडे तोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. राज्यात २००७ ते २०१६ मध्ये सुमारे १५ लाख वृक्षांची अवैध कटाई करण्यात आली. यात सुमारे १०० कोटींची हानी झाली. सर्वाधिक २ लाख झाडे २००९ मध्ये तोडण्यात आली. दरवर्षी सरासरी दीड लाख झाडे राज्यातील जंगलांमध्ये कापली जातात. राज्यातील वनक्षेत्रात सुमारे ८८.२५ कोटी वृक्ष आहेत. राज्यातील काही भागात सामूहिकरीत्या होणारी वृक्षतोड गंभीर बाब बनली आहे. साग वृक्षांना लाकूड तस्करांनी मोठे ‘लक्ष्य’ केले आहे. अवैध वृक्षतोडीपैकी ७० टक्के झाडे सागाचीच होती. राज्यातील यवतमाळ, गडचिरोली आणि धुळे वनवृत्तात सर्वाधिक वृक्षतोड झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
वनक्षेत्रातील गस्त, आरागिरण्यांची तपासणी आणि चेकनाक्यांवर वनोपजांची तपासणी यातून वृक्षतोडीला आळा घालण्याचे प्रयत्न होत असले, तरी पुरेशा मनुष्यबळाअभावी काही भागात वनसंरक्षणासाठी मर्यादा आल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी वनरक्षकांना आधुनिक शस्त्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. गस्तीसाठी जीपगाडय़ा पुरवण्यात आल्या आहेत. वृक्षतोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर भारतीय वन अधिनियम १९२७ मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाते, पण अजूनही वृक्ष तस्करांवर आणि अतिक्रमणे करणाऱ्यांवर वचक निर्माण झालेला नाही, अशी खंत वनाधिकारी व्यक्त करतात. घरे, कुंपण आणि इंधनासाठी होणारी लाकूड कटाई ही गावांजवळच्या जंगलांमध्ये दिसून येते, पण सर्वाधिक नुकसान शेतीसाठी जमीन तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये होते. मध्यंतरी जंगलालगत शेतीसाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड झाली. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याच्या काळात वृक्षतोडीने मोठा वेग घेतल्याचेही दिसून आले. राज्यात सुमारे १ लाख हेक्टर वनक्षेत्र हे वनहक्काच्या माध्यमातून दिले गेले आहे. लाकडांची तस्करी आणि अतिक्रमणांसाठी जंगलतोडीमुळे वृक्षआच्छादन कमी होत आहे. राजकीय पक्षही अतिक्रमणासाठी प्रोत्साहन देत असल्याने मोठय़ा प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास होत आहे. वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज क्षीण होत चालला आहे.

अवैध वृक्षतोड गंभीर -किशोर रिठे
देशात सर्वच राज्यांमध्ये वनक्षेत्रातील अतिक्रमणे रोखण्यात अपयश आल्याचे दिसून येते, पण महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात होणारी वृक्षतोड ही चिंताजनक आहे. एकीकडे वृक्षलागवडीला प्रोत्साहन द्यायचे आणि दुसरीकडे वृक्षतोडीला मोकळीक, यातून काहीही साध्य होणार नाही. जंगलातील अतिक्रमणे कुठल्याही स्थितीत खपवून घेता कामा नये. वन कायद्याचा धाक नाही, ही तर अधिकच गंभीर बाब असल्याचे वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांनी सांगितले.

uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kasheli village in Rajapur is the first solar village in the state
राजापुरातील कशेळी गाव राज्यातील पहिले ‘सोलर गाव’
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
tabebuia rosea trees bloom along vikhroli highway
टॅब्यूबियाच्या फुलांनी विक्रोळी परिसर बहरला
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
mmrda Seeks Permission To Cut Trees kalyan bypass road project
डोंबिवली मोठागाव-गोविंदवाडी वळण रस्त्यावरील १११० झाडांवर कुऱ्हाड; बाधित झाडांच्या बदल्यात १७ हजार झाडांचे रोपण
forest lands latest news in marathi
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात
Story img Loader