शाळाबाहय़ मुलांच्या जिल्हय़ातील सर्वेक्षणात, शहरी व ग्रामीण भागात एकूण १ हजार ११६ मुले आढळली आहेत. त्यातील ४६४ मुले कधीही शाळेत न गेलेली तर ६६४ मुलांनी मध्येच शाळा सोडलेली आहे. या सर्व मुलांना त्यांच्या वयोगटानुसार शाळेतील वर्गात दाखल केले जाणार आहे. नगर शहरात केवळ २९ मुले शाळाबाहय़ आढळली आहेत.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती अण्णासाहेब शेलार व शिक्षणाधिकारी अशोक कडुस यांनी ही माहिती दिली. सर्वाधिक शाळाबाहय़ मुले राहाता तालुक्यात (२५३) तर सर्वात कमी शाळाबाहय़ मुले श्रीरामपूर तालुक्यात (१३) आढळली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी अशी : अकोले ६७, संगमनेर ७१, कोपरगाव ८२, राहुरी ८८, नेवासे १६८, शेवगाव २८, पाथर्डी १३९, जामखेड ३६, कर्जत ४२, श्रीगोंदे ५४, पारनेर २० व नगर ३१.
यापूर्वी शिक्षण विभागाने नगर जिल्हय़ातील शाळाबाहय़ स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण सात महिन्यांपूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये केले होते. त्या वेळी स्थलांतरितांमध्ये सुमारे १ हजार ६०० मुले शाळाबाहय़ आढळली होती. त्यापेक्षा आणखी वेगळी मुले दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात आढळली आहेत.
जि.प.च्या ज्या शाळांत, ज्या दिवशी अर्धवेळ शाळा भरते (बहुतांशी आठवडे बाजारचा दिवस) तो दिवस दप्तरमुक्तीचा व योगदिवस म्हणून जाहीर करण्याचा निर्णय शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज, सोमवारी झालेल्या शिक्षण समितीत घेण्यात आला. गेल्या वर्षभरात जि.प. शाळांतील ११६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यातील बहुतांशी जण पाण्यात बुडून मरण पावले. त्यातील २८ जणांच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान प्रत्येकी ७५ हजार रुपयांप्रमाणे मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित ८८ विद्यार्थ्यांचे ६५ लाख रुपयांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती सभेत देण्यात आली.

Story img Loader