पाझर तलावाच्या बांधकामामध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा वाढीव कामाच्या मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेऊन, खोटा व बनावट दस्तऐवज तयार करून सरकारची १० लाख ४ हजार ७५ रुपयांची फसवणूक लाचलुचपत विभागाच्या जालना येथील अधिकाऱ्यांनी उजेडात आणली. या प्रकरणी जि. प. लघुपाटबंधारे विभागाच्या सिल्लोड येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व मजूर संस्थेचा अध्यक्ष अशा तिघांना फुलंब्री पोलिसांनी अटक केली.
जि. प. लघुपाटबंधारे सिल्लोड विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता दत्तात्रय किसनराव गवळे (वय ५२, सध्या प्रभारी उपविभागीय अभियंता, सिल्लोड, पद्मपाणी हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. ९, न्यू नंदनवन कॉलनी, औरंगाबाद), तत्कालीन कार्यकारी अभियंता रावसाहेब मिराजी वाघमारे (वय ५९, सध्या सेवानिवृत्त प्लॉट नं. १३, सिडको, एन ७, समर्थ रेसिडेन्सी, औरंगाबाद) व चितेगाव येथील संत ज्ञानेश्वर मजूर सहकारी संस्थेचा तत्कालीन अध्यक्ष भानुदास गजानन राईद (चित्तेपिंपळगाव, तालुका औरंगाबाद) यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलिसांत गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक करण्यात आली. फुलंब्री तालुक्यातील रेलगाव पाझर तलाव भाग एकच्या २००९ ते २०१० दरम्यान झालेल्या कामाचे हे प्रकरण आहे.
औरंगाबाद जि. प.च्या सिंचन विभागाद्वारे २००७-०८, २००८-०९ व २००९-१० या काळात कोल्हापूर बंधारा व पाझर तलावाच्या बांधकामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या अनुषंगाने जास्तीत जास्त बांधकाम किंमत असलेल्या पाझर तलावांपैकी रेलगाव भाग एक पाझर तलाव (किंमत ५० लाख रुपये), चौका येथील पाझर तलाव व कोल्हापूर बंधारा (किंमत ४८ लाख १३ हजार रुपये) या कामाची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये रेलगाव येथील तलावाच्या बांधकामात २००९-२०१० दरम्यान तत्कालीन शाखा अभियंता गवळे, कार्यकारी अभियंता वाघमारे व संत ज्ञानेश्वर मजूर संस्थेचा (चित्तेगाव) तत्कालीन अध्यक्ष भानुदास राईद यांनी संगनमत करून, प्रत्यक्ष कामापेक्षा वाढीव स्वरूपाच्या मोजमापाच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेऊन खोटा व बनावट दस्तऐवज तयार केला. तो खरा असल्याचे दाखवून वेळोवेळी रकमा मंजूर करून सरकारची १० लाख ४ हजार ७५ रुपयांची फसवणूक केली. फुलंब्री पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघा आरोपींना अटक केली.
लघुपाटबंधारेअंतर्गत १० लाखांची बनवेगिरी उजेडात, तिघांना अटक
पाझर तलावाच्या बांधकामामध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा वाढीव कामाच्या मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेऊन, खोटा व बनावट दस्तऐवज तयार करून सरकारची १० लाख ४ हजार ७५ रुपयांची फसवणूक लाचलुचपत विभागाच्या जालना येथील अधिकाऱ्यांनी उजेडात आणली.
First published on: 26-03-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 lakhs fraud in irrigation