वेळेवर जेवण मिळत नाही, प्रकृती खराब झाली तर उपचार मिळत नाही, लग्न करायला परवानगी मिळत नाही, यासारखी अनेक कारणे सांगत गुरुवारी दहा जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत अतिरिक्त पोलीस महासंचालक जावेद अहमद यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ात या वर्षांत नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्या तुलनेत पोलीस व सुरक्षा दलाची कामगिरी मात्र उंचावली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या एका भूसुरूंग स्फोटाचा अपवाद वगळता नक्षलवाद्यांना या वर्षांत कोणत्याही मोठय़ा घटनेची नोंद करता आली नाही. यातून आलेल्या वैफल्यातून आता या चळवळीतील अनेक जण शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा फायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही वर्षांंपासून या चळवळीत सक्रीय असलेल्या दहा नक्षलवाद्यांनी अहमद यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यात प्लॉटून क्रमांक १४ चा उपकमांडर उमेश उर्फ सरजू दानो मट्टामीचाही समावेश आहे. संतीला उर्फ निर्मला बटरसिंग कोवासी, राजू उर्फ नथ्थू रावजी नरोटे, देवे उर्फ सुशिला दीनानाथ डुग्गा, रामदास उर्फ रमेश कोलू गावडे, शिला उर्फ आशा हिचामी, सन्नी उर्फ गुन्नी मासा महाका, गणेश उर्फ देवाजी चैतू नैताम, किशोर उर्फ मधुकर मट्टामी व महेश उर्फ देवसाय कोरेटी या नक्षलवाद्यांनी आज पोलीस मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात शरणागती पत्करली. यापैकी कुणीही माओचा विचार पटला नाही म्हणून चळवळीचा त्याग केला, असे म्हणाले नाही. अनेक गुन्हे दाखल असलेल्या या दहा नक्षलवाद्यांना माओ ठावूकच नसल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले. जंगलातील जीवन अतिशय खडतर असून अनेकदा जेवण न मिळाल्याने उपाशी राहावे लागते. सातत्याने उपासमार सहन करावी लागल्याने त्याचा प्रकृतीवर परिणाम होतो. अनेकदा प्रकृती खराब झाली तर जुजबी गोळ्यांशिवाय दुसरे कोणतेही उपचार मिळत नाही. चळवळीचे नेतृत्व सुद्धा जंगलात राहणाऱ्या सदस्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था निर्माण करत नाहीत. अनेकदा पायी चालल्यामुळे थकवा येतो, अशी कारणे सांगत या नक्षलवाद्यांनी चळवळीचा त्याग केला. हे सर्व नक्षलवादी या जिल्ह्य़ात सक्रीय असलेल्या कंपनी क्रमांक चार, तसेच चातगाव दलममध्ये, तर काही नक्षलवादी प्लॉटून क्रमांक ३ व १३ मध्ये सक्रीय होते.
लग्नाची परवानगी नाकारली
शरण आलेल्या किशोर मट्टामी व सुशिला डुग्गा या दोघांचे दलममध्ये असताना प्रेम जुळले. या दोघांनी नेतृत्वाकडे लग्न करण्याची परवानगी मागितली. ती नाकारण्यात आली. त्यामुळे या दोघांनी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचे आज स्पष्ट झाले. शरण आलेल्या गणेश नैताम व सन्नी महाका या दोघांच्या प्रेमविवाहाला सुद्धा चळवळीने विरोध केला होता. त्यामुळे त्यांनीही शरणागतीचा मार्ग पत्करला. आता या चौघांचे विवाह पोलिसांकडून आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.
गडचिरोलीत १० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
वेळेवर जेवण मिळत नाही, प्रकृती खराब झाली तर उपचार मिळत नाही, लग्न करायला परवानगी मिळत नाही, यासारखी अनेक कारणे सांगत गुरुवारी दहा जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत

First published on: 20-12-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 naxals surrender in gadchiroli