नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीत दरड कोसळून आठ जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. तळोदा तालुक्यातील मौजे वाल्हेरीचा पाडा सोजरबार येथे ही दुर्घटना घडली. चार दिवसात नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठार झालेल्यांची संख्या १० वर पोहोचली असून पुरात वाहून गेलेल्या तिघांचा अद्याप शोध लागलेला नाही.
नंदुरबार जिल्ह्यात २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत सलग चार दिवस जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तर सलग १९ ते २० तास अतिवृष्टी झाली. त्यामुळे याच भागातील शहाद्यात पाणीच पाणी झाले होते. तापी, गोमाई, वापी अशा सर्वच नद्यांना पूर आला. याच दरम्यान तळोदा तालुक्यात वाल्हेरीचा पाडा सोजरबार येथे दरड कोसळून ही दुर्घटना घडल्याची माहिती नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दामा कागडा वळवी (२५), शर्मिला दामा वळवी (५), विक्रम दामा वळवी (२), रमिला निमजी वळवी (२), भाया निमजी वळवी (१), इंदुबाई सोबदा वळवी (४५), सेवा पुन्या वळवी (२०), मुकेश कर्मा वसावे (१५) या आठ जणांचा दरडी खाली दबल्याने मृत्यू झाला तर सुकडा दामा वळवी (२०) आणि निमजी माथ्या वळवी (३५) हे दोघे गंभीर जखमी झाले. मृत व जखमी हे सोजराबार, अस्तंभा, पाडवे धडगाव, पायामुंड धडगाव येथील रहिवासी आहेत. शहादा तालुक्यातील मौजे कोठली येथील मुकेश विजय शेवाळे (१९) हा वाकी नदीच्या तर मगन रामसिंग वळवी (१९) हा आमखेडीपाडय़ाच्या नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. अस्तंभाचा पाटलीपाडा येथे गुणबारा नदीच्या पुरात रोशन काल्या वळवी (८) वाहून गेला. या सर्वाचा शोध अद्याप लागलेला नाही. तसेच जैवा काल्या वसावे (१४) आणि नोश्या मांगटा वसावे (१५) या दोन मुली देवमोलबारी नदी पार करत असताना वाहून गेल्या. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.

Story img Loader