बाराव्या पंचवार्षिक योजनेत आरोग्य संशोधन हा मध्यवर्ती विषय राहणार असून, त्यासाठी वर्षांला तब्बल दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत ही तरतूद पाचपट असेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पुण्यात दिली.
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत (एनआयव्ही) ‘बायो-सेफ्टी लेवल ४’ ही आशिया खंडातील पहिली प्रयोगसाळा उभारण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन आझाद यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य मेजर जनरल डॉ. जे. के. बन्सल, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. टी. रामासामी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. व्ही. एम. कटोच, एनआयव्हीचे संचालक डॉ. ए.के. श्रीवास्तव हे यावेळी उपस्थित होते.
पुण्यातील या प्रयोगशाळेमुळे विविध प्रकारच्या विषाणूंचे विश्लेषण, संशोधन व त्यांच्यावर मात करण्यासाठी लसी विकसित करण्यासाठी उपयोग होणार आहे. दहशतवादी जैविक हल्ल्याच्या तयारीत असताना यासारख्या प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार असल्याबद्दल आझाद यांच्यासह विविध वक्त्यांनी एनआयव्हीच्या संशोधकांचे कौतुक केले. आझाद म्हणाले की, बाराव्या पंचवार्षिक योजनेचे नियोजन सुरू आहे. त्यात आरोग्याला मध्यवर्ती स्थान देण्यात आले असून, अकराव्या योजनेच्या तुलनेत आता पाचपट निधी देण्यात येणार आहे. आरोग्यविषयक संशोधनासाठी असलेले आरोग्य संशोधन विभाग व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेसाठी वर्षांला तब्बल रक्कम १० हजार कोटी रुपये राखून ठेवण्यात आली आहे. याशिवाय १५० सरकारी महाविद्यालयांमध्ये संशोधन विभाग, गट पातळीवर ५० आरोग्य संशोधन विभागांची उभारणी, आरोग्य संशोधन संस्थांसाठी अधिस्वीकृती असे विविध उपाय हाती घेतले जाणार आहेत.

Story img Loader