नवी मुंबई येथील जुई गावात राहणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या मुलाचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्याचीही माहिती समोर आली आहे. कामोठे जवळ असलेल्या जुई या ठिकाणी तुषार रणखांबे हा आपल्या आई वडिलांसोबत राहात होता. सोमवारी दुपारी १ च्या सुमारास तुषार शाळेतून घरी परत आला. त्यानंतर तलावावर पोहायला गेला.
तुषारचे आई वडिल घरी नव्हते त्यामुळे त्यांना तुषार नेमका कुठे गेला आहे हे ठाऊक नव्हते. जेव्हा त्याचे आई वडिल घरी आले तेव्हा त्यांना तुषार दिसला नाही. त्यांनी गावात त्याची शोधाशोध सुरु केली. त्याचे आई वडिल तलावाजवळ आले तेव्हा त्यांना तुषारचे कपडे दिसले. काळजीने ग्रासलेल्या आई वडिलांनी आम्हाला आणि अग्निशमन दलाला याबाबत कळवल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
तुषारला पाण्याचा अंदाज आला नसावा कारण तो पट्टीचा पोहणारा नव्हता त्याचमुळे बुडून त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तुषार जेव्हा पाण्यात बुडाला तेव्हा दुपारची वेळ असल्याने त्याला वाचवण्यासाठी कोणीही येऊ शकले नाही असेही पोलिसांनी म्हटले आहे. तुषारच्या मृत्यूप्रकरणी आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
तुषारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडाल्याने श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. तुषार पाचवीत शिकत होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या आई वडिलांना देण्यात आला. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.