शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील आरक्षण इमारतीच्या पाठीमागे असणाऱ्या मोठय़ा वृक्षांची यंत्र लावून तोड केली. या वृक्षांवर पांढऱ्या बगळ्यांची अनेक घरटे होती. वर्षांनुवर्षे ते त्यांचे निवासस्थान होते. यंत्र लावून झाडाची कत्तल केल्याने फांद्या खाली पडल्या आणि अनेक पक्षी मरण पावले. अनेकांचे पंख तुटले, अनेक जण फांद्यांमध्येच अडकले. सकाळी जेव्हा बहरलेले ते झाड तोडल्याचे लक्षात आले, तेव्हा मृत पक्ष्यांचा त्या झाडाभोवती अक्षरश: सडा होता. मांजर, भटकी कुत्री त्यावर ताव मारत होते. घटनेचे गांभीर्य पक्षिमित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगबग केली आणि ८३ पक्ष्यांना सिद्धार्थ उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पाठविले. केवळ आरक्षण इमारतीच्या पाठीमागे असणाऱ्या वाहनतळात लावलेल्या दुचाकींवर पक्षी घाण करतात म्हणून झाड तोडण्याचा तुघलकी आदेश अधिकाऱ्याने दिला. सामान्यत: झाड तोडताना पक्ष्यांना हुसकावून लावले जाते. मात्र, यंत्र लावूनच वृक्षतोड झाल्याने अनेक पक्षी मरण पावले. अनेक जण एकाच ठिकाणी मृत्यू पावल्याने त्या अधिवासातील इतर पक्षी आज घाबरल्याचेही पक्षिमित्रांना दिसून आले. जेएनसी महाविद्यालयातील सुश्रुत करमरकर म्हणाला, सकाळी अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सकाळी आम्ही अनेकांना वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. ८३ पक्षी आम्ही वाचवू शकलो. मात्र अनेक पक्षी या घटनेमुळे मृत्यू पावले. वृक्षतोड करण्यास कोणी परवानगी दिली होती, याचा शोध आता सुरू झाला आहे.

Story img Loader