खाजण रस्त्याच्या भरावामुळे नैसर्गिक पाणी परतण्यास मज्जाव
नितीन बोंबाडे, लोकसत्ता
डहाणू : डहाणू तालुक्यातील आसनगाव येथील खाजण रस्त्याच्या भरावामुळे भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. आसनगाव येथून डहाणू थर्मल पावरकडे राख वाहून आणण्यासाठी येथील खारभूमीत ५ ते ६ मीटरचा भराव टाकण्यात येत असल्याने नैसर्गिकरित्या येणारे पाणी परतण्यास मज्जाव झाला आहे. हे खारेपाणी भातशेतीत शिरून जवळपासची तब्बल १०० हेक्टर भातशेती वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
आसनगाव येथे खारभूमी विकास महामंडळाकडून स्थानिक शेतकरी तसेच सुशिक्षित बेकार तरुणांना कोळंबी प्रकल्प राबविण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे खाजण जागेत पावसाचे पुराचे पाणी तसेच समुद्राच्या भरतीचे पाणी पसरून गावामध्ये पाणी शिरण्याचा धोका भेडसावत नव्हता.
आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे परिसरात ३०० एकर क्षेत्रात शेतकरी भातशेती करून उदरनिर्वाह करतात. सन १९९९ मध्ये थर्मल पॉवर प्रकल्पाची राख वाहून नेण्यासाठी खारभूमीत ५ ते १० मीटर दगड मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे नैसर्गिकरीत्या पाणी पसरण्यात अडथळा निर्माण झाला आहे. या भरावामुळे पावसाचे पाणी अडवले जाऊन पाणी गावाच्या दिशेने पसरू लागते.
आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे, पळे, तलाईपाडा, कासपाडा, स्टेशन पाडा , अत्री अपार्टमेट, दुबलपाडा या भागाला काही वर्षांपासून पुराचा सामना करावा लागत आहे.
भातशेतीत खारे पाणी साचून राहत असल्याने जमीन नापीक बनली आहे. त्यामुळे १०० हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच नजीकच्या सर्व गोडय़ा पाण्याच्या विहिरींनाही खारे पाणी लागले आहे. खारे पाणी घुसून जमीन नापीक होत चालली आहे. शिवाय खारभूमीत वाढणाऱ्या वनस्पतींचे जंगल येथे उभे राहिले आहे.
आसनगाव, कापशी, डेहणे, पळे, या भागातील शेतजमिनी नापीक बनल्याने शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन निघून गेले आहे. खाजन जागेत माती भराव करण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा बनून पाणी साचत आहे.
अशोक मोर्या, वाणगाव
अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न
भरावामुळे पावसाळा आणि भरतीच्या वेळेत वेगाने खारे पाणी शेतजमिनीत घुसले तर आधीच भूमिहीन असलेला शेतकरी शेतिहीन होण्याचा धोका आहे. येथील शेतकऱ्याला रोजगारासाठी गाव सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आसनगाव येथे खाजण भागात नैसर्गिक पाण्यात तयार केलेले कृत्रिम अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाकडे कॅप्टन सत्यम ठाकूर हे पाठपुरावा करत आहेत.