राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी जिंकला. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहामध्ये दिलेल्या भाषणादरम्यान शिंदे यांनी आपल्या राजकीय बंडापासून ते राजकारणातील प्रवासाबद्दल सविस्तर भाष्य करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात तुफान फटकेबाजी केली. मात्र यावेळेस आपले राजकीय गुरु आनंद दिघे यांच्याबद्दल बोलताना शिंदे भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. इतकच नाही तर आनंद दिघेंचा मृत्यूनंतरच्या उद्गेकामध्ये १०० ते १५० जणांचा मृत्यू झाला असता असं शिंदेंनी म्हटलं आहे.
नक्की पाहा >> Video :…अन् तो प्रसंग सांगताना एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला
“२०-२५ वर्ष एकनाथ शिंदेंने रक्ताचं पाणी केलंय. मी १७ वर्षांचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणामध्ये मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण सिनियर होते. त्यांना बोललो की यांना करा तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, मला शिकवतो का?,” अशी आठवण शिंदेंनी सांगितली. पुढे बोलताना शिंदेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन निशाणा साधला. “मी कधी घरच्यांचा विचार केला नाही. बापाचा नाव घेतलं, कोणी पोस्टमॉर्टम म्हणाले,” अशी आठवण शिंदेंनी करुन दिली.
एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या मृत्यूच्या वेळेची परिस्थितीही या वेळेस सांगितली. “अचानक दिघेसाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर मी कोलमडून पडलो नाही. ही कोलमडून पडयाची वेळ नाही हे मला ठाऊक होतो. मी सिंघानियामध्ये गेलो तर तिथे जनतेचा संताप दिसून येत होता. आम्ही आधी रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर आनंद दिघेंचं पार्थिव पोलिसांच्या गाडीमधून टेंभी नाक्याला घेऊन जाऊ लागतो तेव्हा लोक मागे मागे चालू लागले,” अशी आठवण सांगितली. यावेळे शिंदे यांनी, “मी तिथे नसतो तर सिलेंडर्सचा स्फोट होऊन १०० ते १५० जणांचा मृत्यू झाला असता,” असं म्हटलं. यापुढे शिंदेंनी आपण तेथे जमलेल्या शिवसैनिकांचा आक्रोश शांत करण्याचा कसा प्रयत्न केला, रुग्णांना कसं बाहेर काढलं याबद्दलची माहिती दिली.
नक्की वाचा >> अजित पवार विरोधी पक्षनेते; फडणवीसांना आठवलं ७२ तासांचं सरकार, म्हणाले “आम्ही ७२ तासांच्या मंत्रीमंडळाचे…”
तसेच पुढे बोलताना या प्रकरणामध्ये १५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र हा दिघेंवरील प्रेमामुळे झालेला उद्रेक होता असं मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर या सर्वांवरील गुन्हे मागे घेतले गेले असेही शिंदे म्हणाले.