यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ६५४ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून साखरेचे उत्पादन ७४४ लाख क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात सध्या केवळ ५३ कारखान्यांमध्ये गाळप सुरू असून १०४ कारखान्यांनी हंगाम बंद केला आहे. साखरेच्या उत्पादनात विदर्भाचा वाटा मोठय़ा प्रमाणात घटला असून यंदा आतापर्यंत विदर्भातील सहा कारखान्यांना फक्त १० लाख क्विंटल साखर उत्पादित करता आली आहे.
यंदा राज्यातील १५७ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला होता. उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे हंगामावर परिणाम होईल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. गेल्या वर्षी याच कालावधीत १७० कारखान्यांनी ६९५ लाख मे.टन ऊसाचे गाळप करून ७९१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदा गाळप मागे आहे. गेल्या दशकभरातील गाळपाच्या आकडेवारीकडे पाहिल्यास २००६-०७ पासून साखरेचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढले असले, तरी मध्यंतरी गाळपाने चढ-ऊतारही पाहिले आहेत. ऊसाच्या तोडणी क्षेत्रात त्या वर्षांत सुमारे ६८ टक्क्यांची वाढ झाली होती. २००९-१० पर्यंत ऊस तोडणी क्षेत्र साडेसात लाख हेक्टरवर स्थिरावले होते. गेल्या वर्षी ते १० लाख २२ हजार हेक्टपर्यंत वाढले आहे. साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात यंदा ९६ सहकारी आणि ६१ खाजगी कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ४ लाख ६३ हजार मे.टन आहे. आतापर्यंत ६५४.२५ लाचा मे.टन ऊसाचे गाळप झाले असून ७४४.३१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा उतारा ११.३८ टक्के आहे.
गाळपात यंदा देखील पुणे विभागाने आघाडी घेतली असून एकूण ५२ कारखान्यांनी २४८.५० लाख मे.टन ऊसाचे गाळप करून २७८.५० लाख क्विंटल साखर तयार केली आहे. विभागातील ३४ कारखान्यांनी हंगाम बंद केले आहेत. सर्वात तळाशी अमरावती विभाग आहे. अमरावती विभागात सहकारी आणि खाजगी अशा दोन कारखान्यांनी केवळ ३.२३ लाख मे.टन ऊसाचे गाळप केले आणि ३.३९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. हा गेल्या दशकभरातील नीचांक आहे. या विभागाचा साखरेचा उतारा १०.५२ टक्के आहे. अमरावती विभागात सध्या एकच सहकारी साखर कारखाना सुरू असून यंदा यवतमाळ जिल्ह्य़ातील वसंत सहकारी साखर कारखान्याने १ लाख ६४ हजार मे.टन ऊस गाळप करून १ लाख ७३ हजार क्विंटल साखर तयार केली आहे. नागपूर विभागात तर एकही सहकारी साखर कारखाना समुरू नाही. या विभागातील एकूण चार खाजगी कारखान्यांनी ६.५७ लाख मे.टन ऊस गाळप करून ६.६९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. यंदा राज्यात साखरेचा उतारा कमी नसून तो गतवर्षीप्रमाणेच आहे. साखरेच्या उत्पादनाही फारशी घट होणार नाही, अशी माहिती साखर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात २००५-०६ मध्ये नोंदणीकृत २०२ साखर कारखान्यांपैकी १२० सहकारी आणि २२ खाजगी कारखाने उत्पादनक्षम होते.

Story img Loader