पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे साधू हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 101 आरोपींना डहाणू न्यायालयाने अन्य गुन्ह्यांमध्ये आज पुन्हा 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
16 एप्रिल रोजी गडचिंचले येथे घडलेल्या या हत्याकांडात दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कासा पोलिसांनी सुमारे 400 ते 500 आरोपींविरुद्ध साधूंवर ठार मारण्याच्या हेतूने हल्ला करणे, साधूंचा खून केल्याचा व आरोपींचा शोध घेताना पोलिसांवर हल्ला करणे असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते.
पालघर : गडचिंचले हत्याकांडप्रकरणी तपासाला गती
गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावानं काठ्यांनी मारहाण करीत निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांड प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू असून पालघर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत. pic.twitter.com/L6P1SUpPrI
— LoksattaLive (@LoksattaLive) April 30, 2020
या हत्याकांडात तिघांचा खून केल्या प्रकरणी कासा पोलिसांनी अगोदरच 101 आरोपींना अटक केली होती. त्यांची पोलीस कोठडी आज 30 एप्रिल रोजी संपत होती. या पार्श्वभूमीवर या सर्व आरोपींना डहाणू न्यायालयात हजर केले असता त्यांना पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, मात्र त्याचबरोबरीने साधू व त्यांच्या चालकाच्या हत्या करण्याच्या प्रयत्न करण्याच्या अन्य गुन्ह्यामध्ये या सर्व 101 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.