मराठी भाषेत समृद्ध साहित्य उपलब्ध असून ते मोठय़ा प्रमाणात वाचले जात आहे. त्याचबरोबर आणखी दर्जेदार साहित्य निर्मिती होऊन ते नवोदित वाचकांपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. त्यासाठी पोषक वातावरण निर्मितीची खरी गरज आहे, असे प्रतिपादन विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त ‘वाचन संस्कृती लोप पावत आहे काय’ या विषयावर राष्ट्रभाषा संकुलातील धनवटे सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते. यावेळी समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजय पाटील, रमेश बोरकुटे, किशोर कन्हेरे, डॉ. सुनील रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. वाचन संस्कृती लोप पावत आहे, असे म्हणणाऱ्यांना चपराक हाणताना प्रा. हरी नरके म्हणाले, दरवर्षी २५० कोटींची मराठी पुस्तके विकली जातात. दरवर्षी पाचशे दिवाळी अंक महाराष्ट्रात निघतात. कोष वाड्मय असलेली मराठी ही जगातील दुसरी भाषा आहे.
बालभारती दरवर्षी १९ कोटी पुस्तके विकते. बालभारती ही संपूर्ण जगातील क्रमांक एकची प्रकाशन संस्था आहे. एकदा वाचनाची गोडी निर्माण झाली की, नेमके काय वाचावे, हे आपोआपच कळते. बालभारतीने एक लाख पुस्तके प्रकाशित केले असून त्यातील एक हजार पुस्तके दर्जेदार आहेत, तर त्यातील १०० पुस्तके जागतिक तोडीची असल्याचे नरके यांनी स्पष्ट केले. मराठीत ज्ञानेश्वरी, संत तुकारामाची गाथा, एकनाथाचे अभंग आजही वाचले जातात. स्वामी, मृत्यूंजय, कोसला, बळी तेवढय़ाच आवडीने वाचले जात आहे. संत तुकाराम महाराजांच्या साहित्यात तर शंभर शेक्सपियरची शक्ती आहे. असे असताना जो वाचनच करत नाही तोच वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची हाकाटी पसरवत आहेत. असे म्हणणे म्हणजे, नवोदित वाचकांना नाउमेद करणे होय.
महाराष्ट्रात ९० टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे. त्यातील दहा टक्के नागरिक जरी वाचन करीत असतील तर ती फार मोठी संख्या आहे. वाचन वाढत आहे. आणखी वाढायला वाव आहे. स्वातंत्र्य काळापूर्वी स्त्रिया वाचन करत नव्हत्या. आता त्याही मोठय़ा संख्येने वाचत आहेत. पाऱ्यावरची मुले, भटक्या जमातींची मुले वाचायला लागली आहेत. त्यांच्यापर्यंत आणखी दर्जेदार साहित्य पोहोचण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक गावातच नव्हे, तर आता वस्त्यात, मोहल्ल्यात वाचनालय निर्माण करून तेथे पुस्तके उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचेही प्रा. नरके म्हणाले.
कपडे, अन्नधान्य महाग झाले तरी ती गरज असल्याने घ्यावीच लागतात, परंतु पुस्तके ही गरज नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वाचनामुळे कक्षा रुंदावते. नवीन विचार करण्याची प्रेरणा मिळते. सामाजिक, सांस्कृतिक आत्मभान निर्माण करते. त्यामुळे गरज म्हणूनही पुस्तके खरेदी करून ती वाचणारे वाचक वाढत आहेत. सध्या द्वेष, तिरस्काराच्या वखारी समाजात पेटल्या असताना वाचन संस्कृती वाढली पाहिजे. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी भाषेत अनेक बोली भाषा असून त्या टिकल्या तरच मराठी टिकेल, असेही प्रा. नरके नमूद केले.
वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी पोषक वातावरणाची गरज’
मराठी भाषेत समृद्ध साहित्य उपलब्ध असून ते मोठय़ा प्रमाणात वाचले जात आहे. त्याचबरोबर आणखी दर्जेदार साहित्य निर्मिती होऊन ते नवोदित वाचकांपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे.
First published on: 14-03-2014 at 12:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 101th anniversary of the yashwantrao chavan celebrated