रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण १०२ नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून आल्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र या रूग्णांपैकी  ४८ जण चिपळूण शहर आणि परिसरातील असून बहुतेकजण एकाच कुटुंबाचे सदस्य किंवा जवळचे नातेवाईक आहेत. याचबरोबर, लोटे औद्य्ोगिक वसाहतीतील घरडा कंपनीचे करोनाबाधित कर्मचारी वाढण्याचा सिलसिला चालूच असून गेल्या २४ तासांत या कंपनीचे तब्बल २७ कर्मचारी करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर रत्नागिरी येथील जिल्हा कोव्हिड रूग्णालयातील २४ रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आणखी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची एकूण संख्या ४९ वर पोचली आहे. यापैकी राजापूर येथील एका ६५ वर्षीय करोनाबाधिताचा आणि  रत्नागिरी येथे ६८ वर्षीय आजारी महिला रुग्णाचा मृत्यू ओढवला. ती करोनाबाधित असल्याचे अ‍ॅन्टीजेन चाचणी अहवालात नमूद केले आहे. खेड येथे २ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच चिपळूण येथे ४९ वर्षीय रुग्णही या आजारावर उपचार चालू असताना मरण पावला. त्यामुळे मृतांची संख्या ४९ झाली आहे.

दरम्यान गुरुवारी दिवसभरात ४५ रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त होऊन घरी गेले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८५८ झाली आहे.  यामध्येही घरडा कंपनीचे कर्मचारी आघाडीवर (२१) असून त्या खालोखाल चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील कोव्हिड निगा केंद्रामधील १० रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे.

जिल्हा कोव्हीड रुग्णालय ६, तर दापोलीचे कोकण कृषी विद्यापीठ कोव्हिड निगा केंद्र आणि वेळणेश्वर कोव्हिड निगा केंद्रातून प्रत्येकी ३ आणि रत्नागिरीतील समाजकल्याण विभागाच्या कोव्हिड निगा केंद्रातील २ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 102 new corona affected in ratnagiri abn