रायगडातील १०२ भाविक उत्तराखंडमधील विविध भागांत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे सर्वजण सुखरूप असून मदत व बचाव कार्यासाठी जिल्ह्य़ातील दोन अधिकारी उत्तराखंडला रवाना झाल्याचे निवासी जिल्हाधिकारी डॉ. जगन्नाथ वीरकर यांनी सांगितले. दरम्यान ठाण्यात स्थायिक असणाऱ्या पण मूळच्या रायगडच्या  गुलाब दोशी या महिलेचा बद्रीनाथ इथे थंडीमुळे मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 राज्यातील विविध भागांतून गुजराती समाजातील १०८ भाविक चारधाम यात्रेसाठी गेले होते. मात्र उत्तराखंडमधील जलप्रलयामुळे हे भाविक बद्रीनाथ इथे अडकून पडले. यात रायगड जिल्ह्य़ातील १७ जणांचा समावेश आहे. यातील १०७ जण बद्रीनाथ येथील परमार्थ आश्रमात सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.  अडकून पडलेल्यांपैकी ठाण्यात स्थायिक झालेल्या गुलाब दोशी या महिलेचा तीव्र थंडीने मृत्यू झाला, तिच्यावर तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. अडकून पडलेल्या सर्व भाविकांना औषधोपचार पुरवण्याची विनंती चमोली येथील जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. बद्रीनाथला जोडणारे सर्व रस्ते नष्ट झाले असल्याने आता हवाई मार्गाने या े भाविकांना बाहेर काढले जाणार आहे. माथेरानमधील पाच जण ह्रषीकेशपासून ५० किलोमीटर अंतरावर अडकून पडले आहेत. मात्र ते सुखरूप आहेत, स्थानिक प्रशासन त्यांच्या सोबत आहे. खालापूर येथील दीपक कांबळे यांच्यासोबत २६ जणांचा ग्रुप बद्रीनाथपासून २६ किलोमीटर अंतरावर अडकून पडला आहे, तर वासंबे तालुका खालापूर येथील २२ जणांचा आणखीन एक ग्रुप उत्तर काशी इथे अडकून पडला आहे. हे सर्व जण सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पनवेल इथून निसर्ग पर्यटन संस्थेचा एक २२ जणांचा गट चारधाम यात्रेला गेला होता. मात्र हा गट आता सुखरूप दिल्लीपयर्ंत पोहचला आहे, तर पनवेलमधील तुळशीधाम येथील ६ जणांचा ग्रुप सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 102 pilgrim of raigad got stuck in uttarakhand
Show comments