शहरात हॉटेल, अमृततुल्य, लॉज, गॅरेज अशा विविध ठिकाणी बालमजूर काम करताना दिसतात. गेल्या पाच वर्षांत बालकामगारांसाठी काम करणाऱ्या चाईल्ड लाईन या संस्थेकडे तब्बल बालकामगारांच्या ११०० तक्रारी आल्या आहेत. मात्र याच काळात कामगार आयुक्तालयाकडून फक्त १०८ बालमजुरांची सुटका करण्यात आली आहे. तक्रारी व सुटका करण्यात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात गेल्या पाच वर्षांत कामगार आयुक्तालयांकडून सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांची माहिती ‘द इंडियन एक्सप्रेस’ने माहितीच्या अधिकाराखाली मागितली होती. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २००७ ते २०१२ या काळात १०८ बालकामगारांची सुटका केली आहे. त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत सहकामगार आयुक्त एस. व्ही. काकडे यांनी सांगितले, की गेल्या पाच वर्षांत सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांपैकी ७५ टक्के बालकामगारांची सुटका ही छोटय़ा खाद्यपदार्थाच्या दुकानातून केली आहे. बालकामगारांची सुटका करण्यासाठी शासनाने २००६ साली ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना केली होती. त्यानंतर या विभागाने अनेक ठिकाणी यशस्वी छापे टाकून बालकामगारांची सुटका केली होती. २००६ मध्ये २० बालकामगारांची सुटका केली होती. मात्र, पुढील काळात सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांचा आकडा वाढला आहे.
चाईल्ड लाईन संस्थेच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, की २००७ पासून आतापर्यंत आमच्या संस्थेकडे अकराशे तक्रारी आल्या आहे. तेवढय़ाच बालकामगारांची सुटका केली आहे. आमच्या हेल्पलाईनकडे दिवसाला बालकामगारांबाबतचे तीन फोन येतात. काही वर्षांपूर्वी पोलीस, कामगार आयुक्तालय, महिला बालकल्याण विभाग आणि समाजसेवी संस्था या सर्वाचा मिळून एक ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला होता. सुरुवातीस काही ठिकाणी छापे टाकून चांगली कारवाई करण्यात आली आहे. पण आता म्हणावे असे काम होत नाही. सुटका केलेल्या मुलांची सुटका करून त्यांना सुधारणागृहात पाठवले जाते. मात्र, काही घटनांमध्ये पुन:पुन्हा तेच बालकामगार सापडल्याचेही दिसून आले आहे. कामगार आयुक्तालयाने केलेली कारवाई व आम्ही केलेली कारवाईतील तफावत हीच सद्य:स्थिती काय आहे हे दर्शविते. बालहक्क कार्यकर्त्यां अमिता नायडू म्हणाल्या, की बालकामगारांचा प्रश्न हा लालफितीत अडकलेला आहे. कामगार आयुक्तालयाचे लोक आम्हाला जाणूनबुजून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काहीच करत नसल्याचे ही दिसून आले आहे.    

Story img Loader