राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असणारा शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत, ‘‘हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करा’’, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुण्यातील सभेत दिले. याच आव्हानाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं आहे.
नक्की वाचा >> संजय राऊत म्हणतात, “पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर…”
शाह नक्की काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने वचन मोडले. मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडले. ज्यांच्याबरोबर दोन पिढ्या वाद घातला त्यांच्या मांडीवर जाऊन शिवसेना बसली, अशा शब्दांत शहा यांनी शिवसेनेवर पुण्यातील सभेमध्ये टीकास्त्र सोडले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील बूथ प्रमुखांचा मेळावा आणि बूथसंपर्क अभियान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर सडकून टीका केली. हिंमत असेल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन भाजपशी दोन हात करावेत, असे आव्हान अमित शहा यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना दिले.
राऊत यांनी दिले उत्तर…
शाह यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देत राजीनामा देण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा संदर्भ देत राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी आधी भाजपाच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शाह यांच्या आव्हानाला प्रति आव्हान दिलंय. “आपण सुद्धा हिंमत असेल तर १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे १०५ आमदार निवडून येणं शक्य नव्हतं. तुमच्या १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत १०५ निवडून आणून दाखवावेत, हे सुद्धा आमचं आव्हान आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.