मिरजेतील गॅस्ट्रो साथ नियंत्रित येण्याची चिन्हे दिसत नसून आज या साथीच्या आजारात आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या साथीत आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे. दरम्यान आता शहराच्या आसपासच्या खेडय़ातूनही या साथीची बाधा झालेले रूग्ण उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल होऊ लागले आहेत. म्हैसाळ, बेडग आणि कळंबी येथे गॅस्ट्रोचे रूग्ण आढळून आले असून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.
सिकंदर आप्पालाल शेख रा. बोलवाड आणि बाळासाहेब कंकाळे रा. कमानवेस मिरज या दोघांचा आज गॅस्ट्रोसदृष आजाराने रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोघेही मोलमजुरी करणारे होते. शेख हा सिमेंट पाईप कारखान्यात कामाला होता. दि. २३ नोव्हेंबर रोजी त्याला उलटी व जुलाबाचा त्रास होउ लागल्याने वॉन्लेस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर त्याचे मूत्रिपड निकामी होउन आणि श्वसनक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू झाला. तर, बाळासाहेब कंकाळे याचा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११ झाली आहे.
दरम्यान, गॅस्ट्रोने शहराच्या आसपासच्या गावात पाय पसरले असून बेडग, कळंबी आणि म्हैसाळ या तीन गावात गॅस्ट्रो व अतिसाराचे १५ रूग्ण आढळून आले आहेत. म्हैसाळ येथे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून खबरदारीचे उपाय योजण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष िलबाजी पाटील यांनी काल शासकीय रूग्णालयात जाऊन रूग्णांची विचारपूस केली. जिल्हा रूग्णालयात दाखल असणारे ३१ रूग्ण गॅस्ट्रोसदृष आजाराचे आढळून आले आहेत. यापकी म्हैसाळचे ७, वड्डीतील ६, डवळीतील १ आणि अन्य बेडग, कळंबी येथील आहेत. गुरूवारी मिरज शहरात नव्याने २६ रूग्ण शासकीय रूग्णालयात जुलाब व उलटी होत असल्याच्या तक्रारीवरून दाखल झाले असल्याचे रूग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान या साथीबाबत आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहेत. शहरवासीयांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असताना ती पार पाडण्यात प्रशासन अकार्यक्षम असल्याबाबत जिल्हा सुधार समितीच्या वतीने आज न्यायालयात फौजदारी दाखल करण्यात आली. त्या वेळी न्या. एस. एस. पाटील यांनी हे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा